>> भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या निकृष्ट कामांचा विचारला जाब
दिनेश यादव/वाडा, दि. 3 : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाच्या रस्त्याचे काम करणार्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याने हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आजवर या महामार्गावर अनेक निरपराध नागरिकांचे अपघातामुळे बळी गेले असून शेकडो गंभीर रित्या जखमी झाले आहेत. कंपनी प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणा विरोधात शिवसेनेने आज आक्रमक होत वाडा येथील खंडेश्वरी नाका येथे सुमारे अडीच तास महामार्ग रोखला. सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, आमदार शांताराम मोरे व अमित घोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उत्स्फूर्तपणे या रास्ता रोकोत सामिल झाल्या होत्या.
या महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असुन दोन दिवसांपूर्वीच डाकिवली फाटा भागातील तानसा नदीवरील पुलाच्या संरक्षण भिंतीची उंची कमी असल्यामुळे दुचाकीला झालेल्या अपघातानंतर भिंतीवरून खाली कोसळून विनोद पाटील या तरुणाचा नाहक बळी गेला. या रस्त्याबाबत अनेक आंदोलने, निवेदन देऊन सुद्धा कंपनी प्रशासनाला जाग येत नसल्याने या महत्वाच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत हे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलना दरम्यान जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, आमदार अमित घोडा, माजी आमदार दौलत दरोडा, महिला आघाडीच्या दिव्या म्हसकर, कीर्ती हावरे, युवासेनेचे निलेश पाटील आदी पदाधिकार्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
महामार्गावरील सापने व करळगाव येथील नदीवरील पुलाचे काम चालू करावे, या रस्त्यावरील अपघातात मृत व जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, कुडूस येथील उड्डाण पुलाचेे काम मंजूर करून ते लवकर सुरु करावे, वनविभागाच्या जागेवर अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम लवकर सुरु करावे, जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाके बंद करावेत, या रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या ज्या शेतकर्यांना अजूनही मोबदला दिला गेला नाही तो त्वरित मिळावा आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलना दरम्यान प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दिनेश कुर्हाडे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता अरविंद कापडणीस, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, प्रभाकर राऊळ, आमदार यांच्या मध्ये चर्चा होऊन येत्या दोन दिवसात वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून या विषयावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावण्यात येईल व तो पर्यंत या महामार्गावरील टोल नाके तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
तर मागील वर्षी ज्या शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यांना येत्या दहा दिवसात नुकसान भरपाई देण्याचे व गेला महिनाभरात पावसा अभावी निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी करून तसा अहवाल शासनास पाठविण्यात येईल, असे ठोस आश्वासन तहसीलदार दिनेश कुर्हाडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्या नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात तालुका प्रमुख उमेश पटारे, उप तालुकाप्रमुख धनंजय पष्टे, पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी, नरेश काळे, ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद पाटील, शहर प्रमुख प्रकाश केणे, युवा सेनेचे सचिन पाटील, निलेश पाटील, महिला आघाडीच्या वैष्णवी रहाणे, संगीता ठाकरे, मनाली फोडसे, रेश्मा पाटील, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्ष उर्मिला पाटील, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!