दिनांक 22 September 2019 वेळ 4:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अखेर वनक्षेत्रपालांवर निलंबनाची कारवाई

अखेर वनक्षेत्रपालांवर निलंबनाची कारवाई

लाकडाचा विनापरवाना साठा प्रकरण :

दिनेश यादव/वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा सापडल्यानंतर याप्रकरणी वनपालांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यास तेवढेच जबाबदार असलेल्या वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मनसेचे स्थानिक कार्यकर्ते देवेंद्र भानुशाली यांनी याबाबतचा पाठपुरावा करून नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची वाडा येथे भेट घेऊन तक्रारीचे निवेदन दिले. या पार्श्‍वभुमीवर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षकांना याबाबत पत्रव्यवहार करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी वनक्षेत्रपाल सापळे यांना निलंबित केले. या निलंबन कारवाईमुळे अनेक कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

वाडा-मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा असल्याची खबर दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानंतर या पथकाने 11 जुलै 2018 रोजी सायंकाळी डेपोवर धाड टाकली असता तेथे लाकडांचा साठा जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी स्थानिक वनक्षेत्रपाल सापळे यांना कारवाई करण्याची सुचना केली. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी सापळे यांनी तो दास्तान डेपो सील करून 20 जुलै 2018 पासून कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत 287.434 घनमीटर साग, 75.721 घनमीटर खैर, 649.613 घनमीटर इंजाली असा एकुण 1012 घनमीटर विनापरवाना माल जप्त करण्यात आला. याची किंमत बाजारभाप्रमाणे 50 ते 60 लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणी दास्तान डेपोचे मालक सुनिल आंबवणे, राजु शिलोत्री व रमेश पाटील या तिघांवर वन नियमावली 2014 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील तिनही आरोपींची वाडा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली असून पुढील तपास वाडा पश्चिम परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सापळे करत होते. मात्र हा विनापरवाना लाकडाचा साठा त्यांच्याच कार्यक्षेत्रात सापडल्याने व त्यांनी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठांनी त्यांच्याकडून तपास काढून घेऊन या तपासासाठी त्रिसदस्य समिती नेमण्यात आली आहे.

दरम्यान नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. पाटील हे गेल्या महिन्यात जव्हार दौर्‍यावर असताना त्यांनी वाडा येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसेचे कार्यकर्ते देवेंद्र भानुशाली यांनी पाटील यांची भेट घेऊन विनापरवाना लाकडाचा साठा प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांना देऊन यास वनक्षेत्रपालही तेवढेच जबाबदार असताना त्यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. तसेच वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी याप्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षकांना दिले होते. या आदेशानंतर सापळे यांना निलंबित करण्यात आले.

दोषींवर कठोर कारवाई या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.
-राजेंद्र कदम
मुख्य वनसंरक्षक (प्रा.)
ठाणे वनवृत्त

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

comments

About Rajtantra

Scroll To Top