दिनांक 22 September 2019 वेळ 4:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस

पालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस

MANOR DAGAD KHAN KARVAIप्रतिनिधी/मनोर, दि. 25 : मनोर नजीकच्या लालोंढे तलाठी सजा हद्दीतील तीन दगड खाण धारकांना ग्रामस्थांची तक्रार आणि अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडनीय कारवाईसाठी पालघरच्या तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.

लालोंढे गावातील तीन दगड खाणींबाबत स्थानिक रहिवाशांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. खाणीत केल्या जाणार्‍या स्फोटांमुळे घराला हादरे बसणे, भिंतींना तडे जाणे, खाणीतील दगड घरावरील पत्र्यावर पडून पत्रे तुटणे असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच खाण धारकांनी खाणीतील दगड, माती आणि मुरूम याची नोंदवही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना सादर करून तपासणी करून घेतलेली नाही.

ग्रामस्थांच्या या तक्रारींची दखल घेत तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये लालोंढे गावातील संबंधित तीन दगड खाण धारकांना दंडनीय कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. या खाण धारकांना 26 सप्टेंबरला पालघरच्या तहसील कार्यालयात उपस्थित राहून वापरलेल्या गौण खनिजाबाबतचे कागदपत्र सादर करण्यास नोटीशीत सांगण्यात आले आहे.

नियमानुसार वीस फुटापेक्षा जास्त खोल दगड खाण खोदता येत नसताना नागझरी आणि लालोंढे परिसरातील दगड खाणींमध्ये त्यापेक्षा जास्त खोदकाम झालेले दिसते. तसेच येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत दगड खाणी सुरू आहेत. येथे वापरल्या जाणार्‍या क्रशर मशीनमधून उडणार्‍या धुळीमुळे हवेच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. तरीही खाण धारकांवर कारवाई होत नव्हती. मात्र आता तहसीलदारांनी कारवाईच्या प्रक्रियेस सुरुवात केल्याने अनधिकृत दगड खाणीत उत्खनन करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top