दिनांक 22 September 2019 वेळ 5:34 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी

वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी

> कडक उन्हामुळे भातपिके करपू लागली, शेतकरी चिंतातूर

WADA BHAT PIC1प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : गेल्या महिनाभर पावसाने दडी मारल्याने व कडक उन्हामुळे तालुक्यात सर्वत्र भातपिके करपू लागली आहेत. शेतातील उभे भातपीक पाण्याअभावी तडफडून मरु लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे वाडा तहसीलदार दिनेश कुर्‍हाडे यांच्याकडे केली आहे.

वाडा तालुक्यात 18 हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र असुन या क्षेत्रात एकमेव भातपिक घेतले जाते. 18 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 99 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. तर उर्वरीत अवघे एक टक्का क्षेत्रावर सिंचनाची सुविधा आहे. पालघर जिल्ह्यात भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाडा तालुक्यातील बहुतांशी कुटुंबे आज निव्वळ भातशेतीवरच अवलंबून आहेत. विविध सेवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेऊन येथील शेतकरी भातपिक घेत असतो. या वर्षी सुरवातीपासून पाऊस चांगला होता. पेरणी व लागवडीची कामेही सुरळीत झाली होती. मात्र भातपिके बहरत असतानाच गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भातपिके कोमजू लागली. तर आता कडक उन्हामुळे भाताची रोपे करपू लागली आहेत.
मागील बरेच दिवस पाऊस न पडल्याने शेतातील चिखल सुकुन जमीनिला भेगा पडल्या आहेत. जवळपास असलेल्या नदी-नाल्यातून पाणी घेण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे. परंतु अपुर्‍या सोयी, सुविधांमुळे तेही शक्य नसल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर उभी भातपिके तांबडी पडू लागली आहेत.

WADA BHAT PIC2महागडी भातबियाणे, मोठ्या प्रमाणात येणारा मजूरी खर्च त्यात आता निसर्गानेही पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे शासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उप तालुका प्रमुख धनंजय पष्टे, तुषार यादव, पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद पाटील, युवा सेनेचे सचिन पाटील, निलेश पाटील, महिला आघाडीच्या संगीता ठाकरे, मनाली फोडसे, रेश्मा पाटील, शहरप्रमुख प्रकाश केणे, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्ष उर्मिला पाटील, नगरसेवक, नगरसेविका, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top