पत्रकारांना हल्ल्यांपासून संरक्षण देणारे विधेयक मंजूर हल्ला केल्यास दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा

0
1696

मुंबई, दि. 7 : निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने विधेयक मंजूर केले आहे. असा कायदा व्हावा यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विविध संघटना सातत्याने मागणी व पाठपुरावा करीत होत्या. यासाठी अनेक आंदोलने देखील झाली. अखेर आज गुरुवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत हे विधेयक मांडण्यात आले व अपेक्षेप्रमाणे मंजूर देखील करण्यात आलं. हे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानपरिषदेत मांडले. तत्पूर्वी कालच कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. पत्रकारावरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असेल. जखमी पत्रकाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा हल्ला करणार्‍याला करावा लागणार आहे.पत्रकारावर हल्ला केल्यास या विधेयकात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार, हल्लेखोरास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही अशा कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलीय.पत्रकारांचे कार्य चालत असलेल्या मालमत्तेचं नुकसान केल्यास त्यांना नुकसान केलेल्या मालमत्तेच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम द्यावी लागेल. या कायद्याचा गैरवापर करुन कुठल्याही पत्रकारानं खोटी तक्रार केल्यास आणि हे सिद्ध झाल्यास अशा पत्रकारालाही तीन वर्षांपर्यंत कारावास आणि पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.पत्रकारिता आता खर्‍या अर्थाने  लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरेल! आतापर्यंत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून उल्लेख केल्या जाणार्‍या पत्रकारीतेला आज खर्‍या अर्थाने चौथ्या आधारस्तंभाचा दर्जा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मराठी पत्रकार परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी नोंदवली आहे. लोकशाहीच्या विधिमंडळे, न्यायपालिका व कार्यपालिका या तीन आधारस्तंभाना संरक्षण व विशेषाधिकार आहेत. पत्रकारिता केवळ राज्यघटनेतील कलम 19 (1) (अ) द्वारे देशाच्या नागरिकांना मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करीत होती. चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार आपली भूमिका चोख पार पाडत असले तरीही या आधारस्तंभाचा पत्रकारांना काहीच आधार नव्हता. आता या चौथा खांबाचे अस्तित्व राजमान्य झाल्याचे देखील ते म्हणाले.

Print Friendly, PDF & Email

comments