दिनांक 22 September 2019 वेळ 5:05 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आयुषमान भारत आरोग्य योजनेचा पालघरमध्ये शुभारंभ

आयुषमान भारत आरोग्य योजनेचा पालघरमध्ये शुभारंभ

> मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप

AAYUSHMAN BHARATराजतंत्र मीडिया/पालघर, दि. 23 : आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले. खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र केळकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी लता चंदरकर, सुनंदा फर्नांडीस, सुरेखा पामाळे, अशोक जाधव, जीवन गायकवाड यांना प्रातिनिधीक स्वरूपात ई-कार्डचे वाटप करण्यात आले.

देशभरात आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील रांची येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पालघर येथील कार्यक्रमात दाखविण्यात आले. या योजनेच्या पालघर जिल्ह्यातील उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री सवरा म्हणाले, आयुषमान भारत ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून याचा लाभ ग्रामीण भागातील 2 लाख 76 हजार तर शहरी भागातील 43 हजार 38 कुटुंबांना होणार आहे. एकूण 1122 आजारांचा समावेश असलेल्या या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.

गावित म्हणाले, सदर योजना सध्या डहाणू आणि जव्हारमध्ये राबविण्यात येणार आहे, ती संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. आमदार पास्कल धनारे यांनी देखील ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रारंभी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर प्रास्ताविकाद्वारे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कांचन वानेरे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आभार मानले. तर, सूत्रसंचलन डॉ. दिनकर गावित यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. वरळीतील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या जीवनदायी भवन येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे.

कोण असतील या योजनेचे लाभार्थी :-

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटूंब आदी आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी असतील. तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे/ सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडंट, हॉटेल वेटर, मेकॅनिक/वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र असतील.
या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेअंतर्गत त्या कुटुंबांना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील.
यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय जव्हार आणि डहाणू या योजनेमध्ये समाविष्ट असतील.

> योजनेची वैशिष्ट्ये :

  • आयुषमान भारत योजनेत किरकोळ व मोठ्या आजारांवर उपचार
  • ही योजना पूर्णपणे नि:शुल्क असेल.
  • 1 हजार 122 आजारांवर उपचार होणार.
  • सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा समावेश (गुडघा, खुबा, कोपर प्रत्यारोपण)
  • मानसिक आजारावरही उपचार
  • तूर्त राज्यात कार्यान्वित असलेली महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना आयुषमान भारत योजनेसोबतच चालू राहणार.

comments

About Rajtantra

Scroll To Top