दिनांक 26 May 2020 वेळ 8:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी

विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी

LOKRAJYA-SANJEEV JOSHIराजतंत्र मीडिया :

पालघर, दि. 12 : विद्यार्थी हे देशाचे भवितव्य ठरविणारे तरूण आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर ते लोकशाही व्यवस्थेशी जोडले गेले तरच आपल्या परिसराचा विकास घडवून आणू शकणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल. यासाठी सरकार सर्वसामान्यांसाठी करीत असलेल्या कामांची माहिती असणेही तितकेच आवश्यक असून ही अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती लोकराज्यच्या माध्यमातून मिळते, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आज डहाणूतील करंदीकर महाविद्यालयात आयोजित लोकराज्य वाचक अभियानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र घागस यावेळी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जसे शासनाच्या योजना, धोरणांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते त्याचबरोबर वृत्तपत्रांमधून व्यक्त झालेल्या जनमताला शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील करते. यामुळेच या प्रक्रियेत वृत्तपत्रांची भूमिका देखील महत्त्वाची ठरते. त्यामुळेच प्रामाणिकपणे काम करणारी वृत्तपत्रे अजूनही आपली विश्वासार्हता टिकवून आहेत. लोकशाही प्रक्रियेमध्ये नागरीक म्हणून तरूणांचा हवा तेवढा सहभाग दिसून येत नाही. त्यांची मतदानातील टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तरूणांना शासनाच्या कामांची माहिती असणेही गरजेचे आहे. या कामी विद्यार्थी मोलाची भूमिका बजावू शकतात. लोकराज्य अशा माध्यमांपैकीच एक आहे, जे नागरीकांना शासनाच्या कामाशी जोडून ठेवते. शासनाच्या विविध योजनांची त्याद्वारे अधिकृत माहिती मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे मिळणार्‍या माहिती ऐवजी या माध्यमाचा आवर्जून उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी प्र. जिल्हा माहिती अधिकारी ब्रिजकिशोर झंवर यांनी महासंचालनालयाच्या कामाची ओळख करून देऊन लोकराज्य वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माहिती दूत उपक्रमाची सादरीकरणाद्वारे ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घागस यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे लावलेल्या लोकराज्यच्या स्टॉलला भेट देऊन उपस्थितांनी शासनाच्या प्रकाशनांविषयी माहिती जाणून घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top