दिनांक 25 August 2019 वेळ 2:04 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » इस्रायली महावाणिज्यदूतांची ऐनशेत गावाला भेट

इस्रायली महावाणिज्यदूतांची ऐनशेत गावाला भेट

जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करणार्‍या इस्रायली विद्यार्थ्यांचे केले कौतुक 

ISRAIL MAHAVANIJYADUTदिनेश यादव/राजतंत्र मिडीया : 

वाडा, दि. 4 : इस्रायलच्या व्यवस्थापन महाविद्यालयातील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (एश्र अश्र) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्य दूत याकोव फिंकलश्टाईन हे वाड्यात आले होते. यावेळी त्यांनी ऐनशेत गावाला भेट देत इस्रायली विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची पाहणी केली. त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थांशी व युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत दूतावासातील काँसुल गलीत लारोश फलाह आणि राजकीय संबंध आणि विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर उपस्थित होते.

इस्रायली विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने दोन आठवडे वाड्यासारख्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध शाळा दुरुस्तीची कामे, रंगरंगोटी, खेळ यांसह शिकवण्याचे काम केले. या परदेशी पाहुण्यांच्या उत्स्फूर्तपणे काम करण्याच्या शैलीने वाडेकर जनता भारावून गेली होती. या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी इस्रायली महावाणिज्यदूत फिंकलश्टाईन यांनी वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी ऐनशेत गावात केलेल्या कामाची पाहणी केली. तसेच येथील ग्रामस्थ व युवकांशी चर्चा केली. यानिमित्ताने झालेल्या निरोप समारंभाप्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी इस्रायलला देणग्या गोळा करून येथील विद्यार्थ्यांसाठी मोठ्याप्रमाणावर शैक्षणिक साहित्य, पुस्तकं, कपडे, खेळणी आदी साहित्याचे वाटप महावाणिज्यदूत फिंकलश्टाईन, मंत्री सवरा यांच्या हस्ते करण्यात आले.

इस्रायली विद्यार्थ्यांना गेले दोन आठवडे विशेष सहकार्य करणारे 360 फाउंडेशनचे रोहन ठाकरे यांच्या निवासस्थानी याकोव फिंकलश्टाईन आणि मंत्री विष्णु सवरा यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी फिंकलश्टाईन यांनी भारताच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. दरम्यान इस्रायली विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी व मंत्री सवरांनी विशेष कौतुक केले. या विद्यार्थ्यांनी राज्यभरातील शाळांची पाहणी करून वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची निवड केली, हा वाड्याचा गौरव असल्याचे मंत्री सवरा यांनी यावेळी सांगितले. तर इस्रायली विद्यार्थी लिओर टुइल याने चक्क मराठीत भाषण केल्याने उपस्थित सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या परदेशी पाहुण्यांनी ऐनशेत गावात वास्तव्य केल्याने ऐनशेतकरही चांगलेच भारावले असून या परदेशी पाहुण्यांचे कवित्व ग्रामस्थांमध्ये अजून कायम आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून राबविलेले उपक्रम हे आम्हा तरुणपीढीला व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील, असे 360 फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top