डोल्हारा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापकांकडून शालेय पोषण आहारात घपला

0
14

> अडीच क्विंटल तांदळाचा अपहार > अध्यक्षांनी केला काळाबाजार उघड > मुख्याध्यापकार्ंींी कारवाईची मागणी > शालेय व्यवस्थापन समितीची तक्रार

POSHAN AAHAR GHAPLA2मोखाडा, दि. 31 ( दीपक गायकवाड) : विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व शिक्षणाची गोडी लागावी म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून देशभरात शालेय पोषण आहार ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. परंतू दस्तूरखुद्द शाळांकडूनच या योजनेत अपहार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. असाच प्रकार मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या डोल्हारा केंद्रशाळेत घडला असुन मुख्याध्यापकाने अडीच क्विंटल तांदळाचा घपला केल्याचे उघडकीस आले आहे.

साई मार्केटींग अँड ट्रेडींग (जळगांव) या कंपनीच्या पालघर जिल्हा पुरवठादार कार्यालयाकडून डोल्हारा केंद्रशाळेला 28 ऑगस्ट रोजी 12 क्विंटल 64 किलो तांदूळ, 38 किलो मुगडाळ, 63 किलो तेल, 30 किलो मटकी, 30 किलो हरबरा, 15 किलो मसाला, 38 किलो मिठ, 4 किलो जिरे, 4 किलो मोहरी व 4 किलो हळद आदी धान्याचा कागदोपत्री पुरवठा करण्यात आला आहे. तसेच मुख्याध्यापक राजेश सुधाकर यांच्या सही व शिक्क्यानिशी तशी पोहोचही घेण्यात आली आहे. मात्र 29 ऑगस्ट रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ बोढारे यांनी समिती सदस्यांसह पुरवठा करण्यात आलेल्या धान्याची पाहणी केली असता प्रत्यक्षात अडीच क्विंटल तांदूळ कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला. यापुर्वी या शाळेत दोन/तीन वेळा पोषण आहारत अपहार होत असल्याची कुणकुण होती. परंतू पुराव्या अभावी हा काळाबाजार ठेकेदार व मुख्याध्यापकांकडून बिनदिक्कत सुरू होता. त्यामुळे असा भ्रष्टाचार करणार्‍या मुख्याध्यापकावर योग्य ती कार्यवाही करून त्यांची बदली करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे.

केंद्र व राज्य सरकारची ही अत्यंत महत्वाकांक्षी व धोरणात्मक योजना आहे. तथापि योजनेच्या अंमलबजाणीकडे जिल्हापरिषद, पंचायत समिती व शिक्षण विभागाकडून कमालीचा कानाडोळा होत असल्याने गैरप्रकार करणार्‍या संबंधितांचे फावले असल्याचे बोलले जाते. 24 फेब्रूवारी 2015 रोजी डहाणूमध्येही अशाच प्रकारे धान्याचा घपला झाला होता. त्यावेळी ठेकेदाराने शिक्षकांच्या मदतीने तब्बल 38 हजार 699 रूपयांच्या धान्याचा घपला केल्याचे उघड झाले होते. मात्र त्यानंतरही अशा प्रकारच्या काळ्याबाजाराला आळा बसविण्यात प्रशासनाला यश आले नसल्याचे डोल्हारा प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे.

मुख्याध्यापक किंवा नेमून दिलेल्या शिक्षक हा धान्यादी व्यवस्थेवर लक्ष ठेवीत असतो. मात्र निगरानी दाखल ठेवलेले शिक्षकच झारीतल्या शुक्राचार्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत असल्याने अशा शिक्षकांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी व्यवस्थापन समितीने केली आहे.

याबाबत डोल्हारा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक राजेश सुधाकर गवई यांच्याशी संपर्क साधला असता संपूर्ण मालाची पोहोच पावती दिली असल्याचे त्यांनी मान्य केले असून गाडीत जागा नसल्याने संपूर्ण धान्य मिळाले नसल्याचे ढोबळ उत्तर त्यांनी दिले.

Print Friendly, PDF & Email

comments