दिनांक 26 May 2020 वेळ 7:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

पालघर/वार्ताहर : विद्यादानाच्या माध्यमातून समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणार्‍या शिक्षकांचा सन्मान म्हणून शिक्षण विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. 2017-18 या वर्षाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सरकारने शालेय शिक्षण व क्रीडा विभागस्तरावर 108 शिक्षकांची निवड केली असुन यात पालघर जिल्ह्यातील 4 शिक्षकांचा समावेश आहे.

विविध गटात दिल्या जाणार्‍या या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता प्राथमिक शिक्षक गटातून सफाळ्यातील राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाचे सहायक शिक्षक जतीन रमेश कदम, माध्यमिक शिक्षक गटातून वाणगावमधील ज. म. ठाकूर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता विकास पाटील तसेच आदिवासी प्राथमिक गटातून मोखाड्यातील मोर्‍हांडा जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक ईश्वर उखा पाटील यांनी निवड करण्यात आली आहे. तर पालघर तालुक्यातील वडराई जिल्हा परिषद शाळेच्या सहायक शिक्षिका संध्या सुभाष सोंडे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. जतिन कदम हे जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम योगदान आहे. स्मिता पाटील यादेखील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मुख्याध्यापिका असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहमी प्रयत्नशील असतात. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील चार शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असुन या सर्व शिक्षकांचे कौतूक होत आहे. 5 सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top