रिलायन्सच्या कारभाराविरुद्ध शेतकरी संतप्त

0
237

गॅस पाईपलाईन उखडण्याचे केले आंदोलन 

WADA RELIANCE GAS PIPELINEवाडा, दि. 28 : तालुक्यातून 2007 साली रिलायन्स कंपनीची गॅस पाईपलाईन गेली असुन या पाईपलाईनजवळील शेतांची अद्यापही कंपनीने दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे या जागेत शेतकर्‍यांना उत्पन्न घेता येत नसल्याने त्यांचे नुकसान होत असुन यासंदर्भात वारंवार कंपनीकडे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज बिलावली येथे पाईपलाईन उखडण्याचे आंदोलन केले. मात्र प्रशासनाने त्यात मध्यस्थी करून कंपनीबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. भाजपचे नेते नंदकुमार पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

वाडा तालुक्यातून 11 वर्षांपुर्वी रिलायन्स कंपनीची गॅस पाईपलाईन गेली आहे. या प्रकल्पात अनेक गावे बाधित झाली असून बिलावली व डोंगस्ते येथील 103 शेतकर्‍यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन गेली आहे. पाईपलाईनचे काम सुरू असताना ठेकेदाराने शेतामध्ये चर खोदले असून काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीने यातील काही चर बुजवलेले नाहीत. तर काही ठिकाणी चरातील माती बाहेरील शेतात टाकल्याने मातीचे ढीग तयार झाले आहेत. त्यांचेही सपाटीकरण न केल्याने अकरा वर्षानंतरही हे ढीग तसेच आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना या ठिकाणी भात व इतर उत्पन्न घेता येत नाही. परिणामी शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. मागील 10 वर्षात रिलायन्स कंपनी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांकडे अनेकवेळा दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने अखेर बिलावली व डोंगस्ते येथील शेतकर्‍यांनी आज हातात कुदळ, फावडे घेऊन गॅसपाईपलाईन खोदण्याचे काम सुरू केले. अखेर उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार सदानंद घुटे यांनी या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलन स्थळ गाठले व शेतकर्‍यांशी चर्चा करुन रिलायन्स कंपनीच्या अधिकार्‍यांबरोबर बोलून बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. दरम्यान, येत्या आठ दिवसात याबाबतचा निर्णय कंपनीने निकालात न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नंदकुमार पाटील यांनी दिला आहे.

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पडवले, बिलावलीच्या सरपंच रंजिता जाधव यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Print Friendly, PDF & Email

comments