पेसाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न!

0
11

PESA KARYASHALA1पालघर, दि. 28 : जिल्ह्यात आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी सर्व तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वय साधून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा 1996 (पेसा) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित कार्यशाळेत केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी पेसा गावामध्ये शेतकर्‍यांचे गट स्थापन करणे, कुक्कुट पालन, शेळीपालन व गोधडी तयार करणे यांसारखे स्वयंरोजगार स्थानिक गावातच निर्माण करून आर्थिक प्रगती केली जाईल यासाठी ग्रामसेवकांनी प्रयत्नशील राहावे, असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तसेच जिल्ह्यात एकूण 951 पेसा गावांची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायत विभागाचे अभिनंदनही केले.

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजने अंतर्गत 5 टक्के अबंध निधी थेट पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात येतो. याअंतर्गत पेसा गावात ग्रामसभा कोषाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार पेसा कायदा आणि ग्रामसभा तसेच पेसा आराखडा आणि ग्रामसभा कोष यासंदर्भात तालुकास्तरीय अधिकारी आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर असलेल्या आदिवासी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्या भागाच्या सामाजिक, नैसर्गिक आणि भौगोलिक संपन्नतेसाठी करण्यात आलेला पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम कायदा अर्थात पेसा म्हणजे आदिवासी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम करणारा आहे, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी यावेळी व्यक्त केला.

PESA KARYASHALA2जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी उपस्थित ग्रामसेवकांना पेसा कायद्याची तोंडओळख करून दिली. या कार्यशाळेत पेसा कायदा निर्मितीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे कष्टकरी संघटनेचे प्रदीप प्रभू आणि ब्रायन लोबो यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संभाजी आडकूणे व सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments