वाड्यात पोलीसांची शेतकर्‍यांना मारहाण

0
20

> रिलायन्सच्या भूसंपादन मोबदल्यावरुन वाद, 13 शेतकर्‍यांना अटक 

WADA SHETKARI MARHANवाडा, दि. 27 : वाडा तालुक्यातून रिलायन्स कंपनीच्या इथेन गॅस पाईपलाईनचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी संध्याकाळी तालुक्यातील बिलोशी या गावात कंपनीतर्फे पाईपलाईन झाकण्याचे काम सुरू असताना भूसंपादन मोबदल्यावरुन पोलीस व शेतकर्‍यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी एका शेतकर्‍याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. या वादानंतर पोलीसांनी 13 शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असुन पोलीसांच्या या मुजोरीवर संताप व्यक्त होत आहे. तर जमाव आपल्यावर चालून आल्याने कारवाई केल्याचे स्पष्टीकरण पोलीसांतर्फे देण्यात आले आहे.

रिलायन्स या कंपनीची इथेन पाईपलाईन पालघर व ठाणे या जिल्ह्यातून गेली असून तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी झालेल्या भूंपादनात योग्य मोबदला मिळाला नसल्याचे सांगत काही शेतकरी या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. बिलोशी येथील शेतकरी मनोज गायकवाड यांच्या शेतातूनही ही वाहिनी गेली असून त्यांना कंपनीने भूसंपादन मोबदला दिलेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. शनिवारी संध्याकाळी कंपनीतर्फे पाईपलाईन झाकण्याचे काम सुरू असताना मनोज गायकवाड व त्यांचे कुटुंबीय जागेवर येऊन त्यांनी या कामास विरोध दर्शविला. त्यानंतर कंपनीतर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले व पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्यासह दंगल नियंत्रण पथक तसेच अन्य पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी शेतकरी आणि पोलीसांमध्ये जमिन मोबादल्यावरुन चर्चा सुरु असताना पुढे बाचाबाची होऊन अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण यांनी मनोज गायकवाड यांच्या कानशिलात लगावत त्यांना मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकुण 13 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली.

दरम्यान, बाधित शेतकरी हक्क मागत असताना पोलिसांकडून त्यांचा आवाज दाबण्याचे काम पोलीसांकरवी कंपनी करीत असल्याचा आरोप मनोज गायकवाड यांच्या पत्नी मनिषा यांनी केला असून या मारहाण प्रकरणाची व्हिडिओ क्लीप असून या क्लिपची चौकशी केल्यास पोलीसांचे पितळ उघडे होईल, असे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या पाईपलाईनमधुन वाहणार्‍या इथेन गॅसमुळे कोणतीही आपत्ती उद्भवू नये म्हणून यापुर्वीच बिलोशी गावातील शेतकर्‍यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती तसेच याकामी सहकार्य करण्याचे ठरले होते. मात्र शनिवारी प्रकल्पाचे उर्वरित काम सुरु असताना 35 ते 40 शेतकर्‍यांनी विरोध केला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चव्हाण या जमावाशी चर्चा करीत असताना मनोज गायकवाड हा शेतकरी त्यांच्यावर धावून आल्याने सदर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पोलीसांनी दिले आहे.

13 शेतकर्‍यांवर गुन्हे
मनोज उर्फ मुनिराज गायकवाड यांच्यासह एकूण तेरा शेतकर्‍यांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्यासह भारतीय दंड विधान संहितेचे कलम 353, 109, 452,143, 504 तसेच पेट्रोलियम अ‍ॅण्ड मिनिरल पाईपलाईन अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments