पालघर-मनोर रस्त्याची देखभाल दुरुस्ती वार्‍यावर

0
17

> राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरणाची प्रकिया रखडली

PALGHAR MANOR RASTAमनोर/प्रतिनिधी (दि. 24) : फेब्रुवारी 2018 पासून नव्याने घोषित झालेल्या 160-अ राष्ट्रीय महामार्गात पालघर-मनोर रस्त्याचा समावेश करण्यात आल्याने या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र हस्तांतरण प्रक्रियेला विलंब होत असल्याने मागील 6 महिन्यांपासुन रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या 6 फेब्रुवारी 2018 च्या अधिसूचनेनुसार सिन्नर- घोटी – त्र्यंबकेश्वर- मोखाडा – जव्हार – विक्रमगड -मस्तान नाका – पालघर हा 106-अ राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला मस्तान नाका-पालघर शिवाजी चौक हा 20.300 किलोमीटर लांबीचा रस्ता या राष्ट्रीय महामार्गामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यासाठी ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालघरच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रव्यवहार केला होता. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्या ठाणे येथील कार्यकारी अभियंता कार्यालयास हा रस्ता हस्तांतरित करीत असल्याचे पत्र आणि तांत्रिक माहितीचे दस्तऐवज पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिले होते. राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने पालघरच्या बांधकाम विभागाला या मार्गाची देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामासाठी आर्थिक तरतूद करता येत नाही. या रस्त्याच्या लांबीमध्ये घाट रस्ता आहे. भूस्खलन, झाडे पडणे, अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कारवाही करता येत नाही. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता खराब होतो. मात्र रखडलेल्या हस्तांतरण प्रक्रियेमुळे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने असमर्थता व्यक्त केली आहे.

केंद्रीय भूपृष्ठ खात्याच्या अधिअसुचनेस सहा महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही तांत्रिकदृष्ट्या पालघर-मनोर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झालेला नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तसेच इतर दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. रस्त्याचा आराखडा, अर्थसंकल्पीय कामाची माहिती, दोष दायित्व कालावधी असलेली आणि नसलेली रस्त्याची लांबी या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर रस्ता हस्तांतरणाची प्रकिया पूर्ण झाल्याचे मानण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालघरच्या बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळविले आहे.

रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया अधिसूचनेच्या सहा महिन्यानंतरही पूर्ण झालेली नाही. पालघर जिल्हा मुख्यालय झाल्याने या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे मनोर शहर, नंडोरे आणि सेंट जॉन कॉलेज या भागात वाहतूक कोंडी होते. तसेच ठिकठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे हस्तांतरणाची प्रकिया ताबडतोब पूर्ण करून रस्त्याच्या देखभाल, दुरुस्ती आणि इतर कामास सुरुवात झाली पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सिन्नर- त्र्यंबकेश्वर – जव्हार पालघर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. परंतु केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून या महामार्गाचे हस्तांतरण घोषित होऊन निधी वर्ग होत नाही तोपर्यंत पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले पाहिजे.
-दिनेश महाजन,
कार्यकारी अभियंता
राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे.

पालघर – मनोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. निधी आणि रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली पाहिजे. हस्तांतर प्रक्रिया लांबल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये.
-गणेश घोलप,
सामाजिक कार्यकर्ता, मनोर.

Print Friendly, PDF & Email

comments