माधव भांडारी यांच्या उपस्थितीत पोंदा हायस्कूलच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

0
14

राजतंत्र मिडीया

दि. 15 ऑगस्ट 2018: डहाणू शहरातील ” डहाणू एज्युकेशन ट्रस्ट ” संचलीत के. एल. पोंदा हायस्कूल व बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयासाठी उभ्या राहिलेल्या 21 व्या शतकाला साजेशा अशा नूतन वास्तूचे उद्घाटन आज पार पडले. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी असलेले महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भांडारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.

संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे दिवंगत पूनमचंद बाफना यांच्या कुटूंबीयांनी इमारतीसाठी भरीव देणगी दिली असून स्वर्गीय संपतबेन पुनमचंद बाफना यांचे नाव प्राथमिक शाळेला देण्यात आले आहे. बाफना कुटूंबातील श्रीमती राजकुमारी माणेक बाफना व श्रीमती शशिबाला नरेश बाफना यांचे हस्ते हे नामकरण संपन्न झाले. यावेळी मोठ्या संखेने माजी विद्यार्थी उपस्थित होते. बोईसर उद्योगनगरीतील आरती ड्रग्ज या प्रथितयश उद्योगाचे संचालक असलेले शाळेचे एक माजी विद्यार्थी प्रकाश पाटील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी उत्स्फूर्तपणे 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

यावेळी बोलताना संस्थेचे मानद सचिव बटुकभाई पोंदा यांनी 92 वर्षापूर्वी 5/6 मुलांसह सुरु झालेल्या संस्थेमध्ये आज 4 हजार विद्यार्थी शिकत असल्याची माहिती दिली. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले 92 वर्षीय ज्येष्ठ विधिज्ञ सी. एम. बोथरा यांनी 82 वर्षांपूर्वी शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेची विद्यार्थी संख्या 250 पर्यंत पोहोचली असली तरी वर्गात अवघ्या 3 विद्यार्थीनी होत्या अशी माहिती देऊन आपल्या जुन्या आठवणी जागवल्या. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संस्था आता शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असून तीचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची संघटना अस्तीत्वात यावी अशी आवश्यकता प्रतिपादीत केली. त्यामध्ये सक्रीय राहूच, त्याशिवाय संस्थेने आता काळाच्या गरजेप्रमाणे कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा प्रकल्पासाठी राज्य व केंद्र सरकार कडून आवश्यक त्या मान्यता व अनुदाने मिळविण्याची जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही दिली. या शाळेचे माजी विद्यार्थी ते विश्वस्त व संस्थेचे अध्यक्ष असलेले ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना ही नूतन वास्तू म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिलेली गुरुदक्षिणा असल्याची भावना व्यक्त केली.

नूतन इमारतीचे वैशिष्ट्य:

  • पुरेशी हवा व उजेड उपलब्ध होईल अशा प्रशस्त वर्गखोल्या
  • प्रशस्त अशी मार्गिका आणि सीसीटीव्ही यंत्रणेची व्यवस्था
  • सर्व सोयीसुविधांनी युक्त असे पंचतारांकित स्वच्छतागृह

या इमारतीसाठी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले डहाणूतील प्रसिद्ध वास्तुविशारद नंदादीप कोकणे यांनी विनामोबदला सेवा पुरवल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email

comments