विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाने समृद्ध आणि सर्जनशील नागरिक बनावे! – संजीव जोशी

0
20
Boisar Prabhakar Raulउल्हास पाध्ये 
बोईसर दि. १४: विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाने समृद्ध आणि सर्जनशील नागरिक बनावे. केवळ परिक्षेमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करु नका. आवडीचा अभ्यासक्रम निवडा किंवा निवडलेल्या अभ्यासक्रमात आवड निर्माण करा असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी बोईसर येथे बोलताना केले. ते पंचतत्त्व सेवा संस्था व स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी (बोईसर) या संस्थांतर्फे पंचक्रोशीतील शाळांतील १० वी व १२ वी च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी बोईसर येथील टिमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचतत्त्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ होते. व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. दर्शना प्रभाकर राऊळ, संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश सहानी व मानद सचिव हिंदूराव संकपाळ, पर्यावरणप्रेमी मनिष संखे आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण न घेता इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षण घ्यावे असेही जोशी यावेळी म्हणाले. त्यांनी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा आग्रह धरला. प्रभाकर राऊळ यांनी काळाची पाऊले ओळखून एका शैक्षणिक संस्थेचे रोप लावले आणि आज ते तिन शैक्षणिक संस्था प्रभावीपणे चालवित आहेत. असे कार्यक्रम घेऊन मुलांचे मनोधैर्य उंचावत आहेत. त्यांना प्राप्त परिस्थितीत स्वतःला विशेष शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उभ्या केलेल्या कामाबद्दल जोशी यांनी गौरवोद्गार काढले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रभाकर राऊळ यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले व गुणवंत विद्यार्थ्यांमधून उद्याचे सनदी अधिकारी निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणीतरी सांगते म्हणून डॉक्टर अथवा एमबीए किंवा इंजिनिअरिंग असे अभ्यासक्रम न निवडता आपल्याला आवडणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्या आणि पालकांनी देखील विद्यार्थ्यांवर सक्ती करु नये असे आवाहन राऊळ यांनी केले. आपल्या आयुष्यात आई वडीलांचे स्थान अतिशय महत्वाचे असून त्यांना आपले दैवत माना असा सल्ला देखील त्यांनी दिला. ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायची इच्छा असताना अडीअडचणी येत असतील त्यांनी केव्हाही संपर्क साधावा. अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करु अशी ग्वाही देखील राऊळ यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी परिसरातील ३५ शाळांतील गुणवंत विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. सर्व गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
Print Friendly, PDF & Email

comments