दिनांक 18 June 2019 वेळ 6:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्तांची मुंबईकडे कूच

जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्तांची मुंबईकडे कूच

>> स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेस मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर करणार ठिय्या आंदोलन

RELIANCE SHETKARI MORCHAमनोर/प्रतिनिधी, दि. 12 : रिलायन्स कंपनीने गॅस पाईपलाईन प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला देताना दुजाभाव केल्याचा आरोप करत अशा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी आदिवासी शेतकरी समितीने रविवारी (दि. 12) चलो मुंबईची हाक देत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे ते मुंबई अशा लाँग मार्चला सुरुवात केली आहे. 15 ऑगस्ट रोजी अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेस हा लाँग मार्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडकणार असुन आपल्या मागण्यांसाठी येथे ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

रिलायन्स कंपनीकडून मनोरमधील दहेज ते नागोठणे गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम 2015 ला सुरु करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादित केल्या गेल्या. मात्र भूसंपादनाचा मोबदला देताना जिल्ह्यातील पालघर, तलासरी, डहाणू, विक्रमगड व वाडा तालुक्यातील निरक्षर आदिवासी शेतकर्‍यांसोबत दुजाभाव करण्यात आला असुन या प्रकल्पाला विरोध करणार्‍या सुशिक्षित शेतकर्‍यांच्या जमिनीला प्रति गुंठा 3 लाखापासुन 5 लाखापर्यंत, तर निरक्षर आदिवासी शेतकर्‍यांना प्रति गुंठा 175 रुपयांपासून 9 हजार 600 रुपयांपर्यंत मोबदला दिला गेला. त्यामुळे संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देताना रिलायन्सने फसवणूक केल्या आरोप आदिवासी शेतकरी समितीने केला आहे.
RELIANCE SHETKARI MORCHA1भूसंपादन मोबदल्याच्या रकमेत तफावत आढळून आल्यास रिलायन्स कंपनीकडून वाढीव रक्कम देण्यात येईल, असे पत्र रिलायन्स कंपनीकडून गॅस पाईपलाईनचे काम सुरू करताना संबधित शेतकर्‍यांना दिले होते. असे असताना प्रत्यक्षात अदा केलेल्या मोबदल्याच्या रकमेत तफावत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कंपनीकडून शेतकर्‍यांना वाढीव रक्कम देण्यात आली नाही. आंदोलनं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र व्यवहारही झाला. परंतु प्रशासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन अन्याय झालेल्या शेतकर्‍यांच्या हक्कासाठी हा लढा असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

आदिवासी शेतकरी समितीच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात पालघर जिल्ह्यातील विविध भागातील सुमारे दीड हजार शेतकर्‍यांनी काल, रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे (मनोर) येथून पायी चालण्यास सुरुवात केली असुन 15 ऑगस्टच्या पहाटेला मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानावर ठिय्या आंदोनल करणार असल्याचा मनोदय आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे आदिवासी समितीचे अध्यक्ष मधुकर काकरा यांनी सांगितले.

गॅस पाईपलाईनकरिता संपादित जमिनीचा मोबदला अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाढीव स्वरुपात मिळावा. अन्यथा आमच्या जमिनीतील पाईपलाईन काढण्यात यावी. रिलायंस कंपनीकडून संपादित जमिनीच्या बदल्यात देण्यात आलेली रक्कम कंपनीला परत करण्यासही शेतकरी तयार असल्याचे आदिवासी शेतकरी समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top