करंदीकर महाविद्यालयाकडून काळाची पाऊले ओळखून तंत्रज्ञानाचा वापर करणे कौतुकास्पद! – चंद्रगुप्त पावस्कर

0
4

राजतंत्र मिडीया / डहाणू दि. १२: ज्ञान भारती सोसायटीच्या विश्वस्तांनी एस. आर. करंदीकर महाविद्यालयामध्ये काळाची पावले ओळखत तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. हा दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते ज्ञानभारती सोसायटी संचलीत एस. आर. करंदीकर महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ज्ञानभारती सोसायटीचे अध्यक्ष बोमन बरजोर इराणी, मानद सचीव सी. एम. बोथरा, सुधीर करंदीकर, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र घागस, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, नूतन बाल शिक्षण संघाच्या उपाध्यक्षा सौ. संध्या करंदीकर आणि मानद सचीव दिनेश पाटील यांसह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून होत असलेल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहनही पावस्कर यांनी यावेळी केले. तसेच प्रकल्प साध्य करण्यात महत्वाचे योगदान देणारे प्रा. रोमिओ आणि महाविद्यालयाचे तरुण प्राध्यापक पर्सी जामशेतवाला यांचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमात सर्वप्रथम प्राध्यापक जाधव यांनी प्रास्ताविक केले. तर प्राचार्य घागस यांनी संस्थेतर्फे सुरु करण्यात येत असलेले माहिती तंत्रज्ञानातील अभ्यासक्रम, कार्यशाळा आणि वेब कॉन्फरन्सींग याविषयी माहिती सांगून भविष्यात महाविद्यालयातर्फे सुरु करण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. मानद सचीव बोथरा यांनी या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांनी जपून पण मुबलक वापर करावा आणि ज्ञानसंपन्न व्हावे असे आवाहन केले. नगराध्यक्ष राजपूत यांनी आपण या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत व महाविद्यालयातून मिळालेल्या संस्कारांच्या जोरावरच इथपर्यंत पोहोचल्याची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

महाविद्यालयाला हे तंत्रज्ञान पुरविणारे संगणक तंत्रज्ञ फय्याज खान यांनी व्हर्च्युअल क्लासरुमचे सादरीकरण करुन तंत्रज्ञानाची तोंडओळख करुन दिली. या तंत्रज्ञानाद्वारे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुके जोडण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरु असून त्यासाठी येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. किमान 5 एमबी प्रति सेकंद वेगाची इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन घेणेसाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती देऊन आजच्या कार्यक्रमातून कोसबाडचे अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालय इंटरनेटच्या वेगातील मर्यादेमुळे जोडता येऊ शकलेले नसले तरी त्यावर येत्या २/३ दिवसांत मात करु अशी ग्वाही फय्याज यांनी दिली. ही संकल्पना प्राध्यापक रोमिओ मस्करेन्हास यांनी मांडल्यानंतर ६ महिन्यांपासून त्यावर काम सुरु होते. त्याचे हे फलित असल्याचे फय्याज म्हणाले. या संकल्पनेचा ध्यास घेतलेले प्रा. रोमिओ यांनी व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

व्हर्च्युअल क्लासरुमची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • गेस्ट लेक्चरर जगभरातून कोठूनही लॅपटॉप किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून लेक्चर्स घेऊ शकतो.
  • अशा लेक्चर्सचा लाभ पालघर जिल्ह्यातील १२ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी घेता येईल.
  • अशा क्लासरुम मधील मुले लेक्चररना प्रश्न देखील विचारु शकतात. यामुळे हा संवाद दुहेरी असणार आहे.
  • यातून मुंबईतील अनेक मान्यवर प्राध्यापकांचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते.

संबंधित बातमी वाचण्यासाठी भेट द्या तंत्रज्ञानात करंदीकर महाविद्यालयाचे एक पाऊल पुढे

Print Friendly, PDF & Email

comments