दिनांक 21 July 2019 वेळ 6:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात

कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात

Rajtantra_EPAPER_090818_1_090857 - Copyप्रतिनिधी
          वाडा, दि. ८ : तालुक्यातील केळठण येथील वेनस बायोक्यूटिकल कंपनीने कंपनीत निर्माण झालेले रासायनिक सांडपाणी शेजारच्या सार्वजनिक नाल्यात सोडून दिल्याने गोराड गावातील भातशेतीचे तसेच पिण्याचे पाणी प्रदुषित झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
केळठण ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेनस बायोक्यूटिकल ही कंपनी आहे. या कंपनीत सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतून निघणारे सांडपाण्याची व्यवस्था कंपनीने आवारातच करणे गरजचे असताना सांडपाणी कंपनीच्या बाहेर सोडल्याने हे पाणी भातशेतीत पसरले आहे. शेतात रासायनिक पाण्याचे तवंग साचले असून त्यामुळे कित्येक एकर भातशेती धोक्यात आली आहे. सांडपाण्यामुळे दुर्गधी पसरली असून त्या दुर्गधीचा त्रास गोराड येथील ग्रामस्थांना होत आहे. डासांचा प्रादूर्भाव वाढलाआहे. शिवाय गावाला एकमेव पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाण्यातही प्रदुषित सांडपाणी झिरपल्याने पाणीही दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.
गोराड गाव हे शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव असून येथील आदिवासी बांधवांचा शेती हा एकमेव व्यवसाय आहे. मात्र कंपनीचे दुषित सांडपाणी भातशेतीत गेल्याने भातशेती धोक्यात आली आहे. या सांडपाण्यामुळे भातपिक वाया गेले असून आदिवासी शेतकऱ्यानवर उपासमारीचे संकट उद्भभवणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यानां नुकसान भरपाई द्यावी व कंपनी बंद करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले असल्याने जी काही नियमाप्रमाणे येणारी भरपाई मी शेतक-यांना देण्यास तयार आहे. शेतक-यांनी माझ्याशी संपर्क साधावा.
-किशोर शहा, संचालक- वेनस कंपनी
वेनस ही प्रदूषणकारी कंपनी असून या कंपनी मुळे आमच्या शेतक-यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच आमचे आरोग्यही धोक्यात आले असल्याने ही कंपनी बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
-संजय भगत, ग्रामस्थ
गोराड ग्रामस्थांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाले असून प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग, कृषी विभाग यांना चौकशी व तपासणीच्या सुचना दिल्या आहेत. विहीरीचे पाणी दूषित झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असल्याने टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
-विठ्ठल गोसावी,
नायब तहसीलदार वाडा
कंपनीचे दुषित पाणी व विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तात्पुरता स्वरूपात विहीरीचे पाणी न पिण्याच्या सुचना नागरिकांना केल्या आहेत.
-डाॅ. डी .डी.सोनावणे
तालुका आरोग्य अधिकारी

comments

About Rajtantra

Scroll To Top