जव्हार-सेलवास रस्त्यावर माकपाचा रास्ता रोको

0
9

JAWHAR MAKAP RASTAROKOप्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या कर्ज माफीतील त्रुटींविरोधात तसेच आपल्या इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज, बुधवारी सकाळी जव्हार-सेलवास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोनंतर कार्यकर्त्यांनी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक दिली. मात्र याठिकाणी प्रांत अधिकारी व अन्य अधिकारी गैरहजर असल्याने शिष्ट मंडळाला चर्चेसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्रव्यापी शेतकरी संघर्ष अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्या कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या आज 112 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले.

सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या कर्ज माफीतील त्रुटी सुधारुन सरसकट कर्जमाफी करावी, कसत असलेली वन जमीन शेतकर्‍यांच्या नावे करा, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनांची अंमलबजावणी करा, रेशनिंग कार्ड विभक्त करा, बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्या, मुलांना शासकीय वसतिगृहात प्रवेश द्या, कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांना संपूर्ण कर्ज मुक्त करा, शेतमालाला सर्वंकष खर्चाच्या दीडपट भाव मिळावा यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, सर्व कष्टकरी शेतकरी मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर किमान पाच हजार रुपये पेन्शन म्हणून द्या, शेतकर्‍यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्याचे संरक्षण द्या, वनाधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी, आदी विविध मागन्या या आंदोलनदरम्यान करण्यात आल्या. मात्र राज्य सरकार कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रांत अधिकारी व अन्य अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने शिष्ट मंडळाला चर्चेसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे.

पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य रतन बुधर यांच्या नेतृवाखाली या आंदालनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव, माकपाचे जिल्हा कमिटी सदस्य शिवराम बुधर, यशवंत बुधर, विजय शिंदे, शांतीबाई खूरकुटे, सुरेश खुरकुटे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments