आदिवासींचा विकास करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश -आदिवासी युवा संघटना

0
11

AADIWASI VIKASप्रतिनिधी/वाडा, दि. 7 : आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांची अर्थसंकल्पात तरतुद केली जाते. मात्र आदिवसींचा तथा आदिवासी भागाचा विकास होत नाही. आदिवासींसाठी तरतुद केलेला निधी खर्च होतो कि नाही हे पाहण्यासाठी अशा भागाचे प्रतिनिधित्व करणारे आदिवासी लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतात, हे या लोकप्रतिनिधींचे अपयश आहे, अशी खंत आदिवासी युवा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी वाडा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्याच्या नियोजनासाठी आदिवासी युवा संघटनेची आज, मंगळवारी वाडा येथील शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आदिवासी गौरवदिनासंदर्भात माहिती दिली. जग वाचवायचे असेल तर आदिवासी वाचला पाहिजे व तो त्याच्या कला-संस्कृतीसह सन्मानाने जगला पाहिजे, असे आदिवासी युवा नेते संतोष साठे यांनी यावेळी सांगितले. तर आदिवासी हा जल, जंगल, वन जमिनीचा खरा राखणदार असुन त्याला तशा प्रकारचा हक्क मिळविण्यासाठी आम्ही यापुढे संघर्ष करु, असे संघटनेचे जिल्हा सचिव गणेश बाराठे यांनी सांगितले.

आदिवासी समाजाचे अस्तित्व, एकता, संस्कृती दाखविण्यासाठी आदिवासी गौरवदिनी वाडा शहरात भव्य रॅली व महामेळावा आयोजित केला असल्याचे अध्यक्ष नितीन भोईर यांनी सांगितले.

आदिवासी समाजासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्या आदिवासींपर्यंत पोहचविण्यासाठी आमचे नेते, लोकप्रतिनिधी कमी पडतात म्हणून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातूनही आम्ही आमचे प्रश्‍न शासनापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहोत, असे आदिवासी समाजाच्या नेत्या तथा वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर म्हणाल्या.

Print Friendly, PDF & Email

comments