दिनांक 22 September 2019 वेळ 5:19 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » राज्य सरकारी कर्मचारी संपावर : वाड्यातील शासकीय कामकाज ठप्प

राज्य सरकारी कर्मचारी संपावर : वाड्यातील शासकीय कामकाज ठप्प

SARKARI KARMACHARI SAMP

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज, मंगळवारपासुन तीन दिवसांचा राज्यव्यापी संप जाहीर केला आहे. या संपात वाडा तालुक्यातील प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समितीच्या सर्व विभागातील कर्मचारी असे एकूण 171 कर्मचारी सहभागी झाल्याने वाड्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, या संपामध्ये वरिष्ठ अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले नसल्याने कार्यालयाचे दरवाजे उघडे मात्र खुर्च्या रिकाम्या अशी अवस्था दिसून येत आहे.

शासनाने सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मुख्य मागणीसह जानेवारी 2017 पासून रखडलेला महागाई भत्ता, 14 महिन्यांची थकबाकी आणि जानेवारी 2018 पासूनचा वाढीव महागाई भत्ता खर्चाच्या रकमेसह सत्वर मंजूर करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून 1982 ची परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरा, सर्व इच्छुक अर्जदारांना एक विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, आधुनिक आरोग्य केंद्रातील महिला परीचारांना किमान वेतन देण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करा, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करा, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे 100 टक्के आयोजन करा, निवृत्तीचे वय साठ वर्षे करा व पाच दिवसांचा आठवडा जाहीर करा, आदी प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

या संपामुळे जवळ-जवळ सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याने आपल्या विविध शासकिय कामांसाठी तालुक्यातील आदिवासी भागांमधून येणार्‍या सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संपुर्ण दिवस वाया घालवून काम न झाल्याने तसेच नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिकांकडून या संपावर तिव्र नाराजी व्यक्त केली.

तीन दिवसांच्या या राज्यव्यापी संपामध्ये वाडा तालुक्यातील पंचायत समितीचे  105 कर्मचारी, तहसील कार्यालयाचे 22, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 25, भूमी अभिलेख कार्यालयाचे 15, प्रांत कार्यालयाचे 5, वनविभागाचे 3 तर कृषी कार्यालयाचे सर्वच कर्मचारी सामील झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा आमचे मोबाईल अ‍ॅप!

 

comments

About Rajtantra

Scroll To Top