दिनांक 21 September 2019 वेळ 6:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार संख्या असणार्‍या दुकाने व आस्थापनांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

१० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार संख्या असणार्‍या दुकाने व आस्थापनांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क 
           पालघर दि.०४ : महाराष्ट्र दुकाने व आस्थापने अधिनियम (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन)१९४८ मध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारणा करून महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ संपूर्ण महाराष्ट्रकरिता दिनांक ७ सप्टेंबर २०१७ रोजीपासून लागू करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम १९६१ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम २०१७ दिनांक २३ मार्च २०१८ पासून लागू करण्यात आलेले आहेत. सुधारित अधिनियमानुसार ज्या दुकाने, उपहारगृहे तसेच सर्व व्यावसायिक आस्थापनेत १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असतील अशा आस्थापनांना सदर अधिनियम लागू होत आहे.
ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये कामगार संख्या ९ पेक्षा कमी असेल अशा आस्थापनांना नोंदणी/नुतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. सदर आस्थापनेने व्यवसाय सुरू केल्याबाबची केवळ सुविधाकार (पूर्वीचे दुकाने निरीक्षक) यांना ऑनलाईन पद्धतीने Ims.mahaonline.gov.in या वेबसाईटवर (Intimation) देणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार संख्या असेल त्या दुकाने व आस्थापनांची नोंदणी (गूमास्ता), नुतनीकरण अथवा बदल करणेसाठी ऑनलाईन पद्धतीनेच Ims.mahaonline.gov.in या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदारास नोंदणी, नुतनीकरण अथवा बदलाबाबत अर्ज करताना संबंधित कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच सदर सुविधाकरिता २३ रुपये ६० पैसे इतके शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. अर्जदारास जास्तीत जास्त १० वर्षापर्यंत त्यांच्या आस्थापनेचे नुतनीकरण करता येईल. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सुविधाकार यांच्यामार्फत तपासणी करुन, परिपूर्ण अर्जदारास ७ दिवसात नोंदणी, नुतनीकरण व बदलाबाबतचा दाखला ऑनलाईन मिळणार आहे.
जर अर्जदार यांच्या सूचना तथा तक्रारी असल्यास त्यांनी कामगार उप आयुक्त पालघर यांचे कार्यालय एम.आय.डी.सी कर्मचारी वसाहत, चित्रालय, सरोवर हॉटेल समोर, बोईसर पश्चिम, जिल्हा पालघर येथे किंवा acltarapuryahoo.com या ई-मेल आयडीवर सादर कराव्यात, असे आवाहन कामगार उपायुक्त, पालघर शिरीन लोखंडे यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top