दिनांक 12 December 2019 वेळ 10:21 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न

फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न

FAKE NEWS KARYASHALAराजतंत्र न्युज नेटवर्क
            पालघर, दि. ०१ : काही समाजकंटकांकडून जाणूनबुजून फेक न्यूज पसरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन अशा फेक न्युजमुळे मागील काही महिन्यांत देशभरात जमावाने मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या. यात अनेक निष्पाप लोकांना जिव देखील गमवावा लागला. या फेक न्यूज थांबवण्यासाठी विविध स्तरावर पावले उचलली जात असताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तसेच पालघर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयात फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्यासह माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजमाध्यमे सहज उपलब्ध झाल्याने माहिती पुढे पाठविण्याचे काम झपाट्याने वाढले आहे. यामध्ये अनेकदा चुकीची माहिती अनेक जण शहानिशा न करता निरागसपणे पाठवितात. तथापि काही जण जाणीवपूर्वक याचा गैरफायदा घेण्याचीही शक्यता असते. सूज्ञ मंडळींनी अशा माहितीला कठोर विरोध करण्यासाठी चळवळीच्या स्वरूपात काम करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रतिपादित केली.
डॉ. नारनवरे पुढे म्हणाले, फेक न्यूज पसरविण्याच्या घटनांची उदाहरणे इतिहासामध्ये देखील आढळतात. तथापि सध्या प्रत्येक गोष्टीचे डॉक्युमेंटेशन होत असल्याने त्याचा परिणाम अधिक जाणवू लागला आहे. त्यामुळे हे थांबविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना वैचारिक क्षमतेमुळे समाजात विशेष दर्जा आहे. त्यामुळे पत्रकार फेक न्यूजच्या विरोधात काम करून सामाजिक एकता अबाधित राखण्याचे महत्त्वपूर्ण काम करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरोगामी राज्याचे नागरिक म्हणून जगायचे असेल तर हा संदेश समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राजतिलक रोशन म्हणाले, व्यक्त होण्याचा अधिकार समाजातील सर्व घटकांना असला तरीही सर्वांनीच जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. पत्रकारांनी जनजागृती करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर माहिती देण्याची प्रशासनाचीही जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पोलीस दलासाठी स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नेमल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभार यांनी माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगून पत्रकारांनी सामान्य माणसाचे प्रश्‍न मांडताना घटनेचे विवेचन सर्वांगांनी करावे, असे सूचविले.
यावेळी पत्रकारांनीही याविषयी आपले मत मांडले. दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी मार्गदर्शन करताना अशा कार्यशाळांचे स्वरूप औपचारिक राहू नये. जे बेजबाबदारपणे वागतात त्यांना त्याची जाणीव करून देतानाच जे चांगले काम करतात त्यांचे कौतुकही झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच घटनेतील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये समाजाला समजावून देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. निरज राऊत यांनी ब्रेकींग न्यूजच्या घाईमध्ये कधी कधी चुकीच्या बातम्या जातात. त्यासाठी माहिती देणार्‍या यंत्रणांनी देखील व्यवस्थित माहिती द्यावी, जेणेकरून फेक न्यूज तयार होण्यास आळा बसू शकेल, असे सांगितले. तर रमाकांत पाटील यांनी सर्वसामांन्यांना सहजरित्या माहिती उपलब्ध होण्यासाठी शासन आणि प्रशासनानेही जबाबदारीने माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वेळेत माहिती उपलब्ध झाली तर फेक न्यूजला आळा बसण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी माहिती अधिकारी ब्रिजकिशोर झंवर यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केलेल्या या कार्यशाळेबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top