दिनांक 25 May 2020 वेळ 2:12 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » तलासरी : परुळेकर महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

तलासरी : परुळेकर महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

PARULEKAR MAHAVIDYALAYराजतंत्र न्युज नेटवर्क
           तलासरी, दि. ३१ : येथील कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात नुकतेच मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेल्या बदलापूर येथील आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप भेले यांच्या हस्ते कॉ. गोदावरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करून मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वारली चित्रकला भित्तिचित्राचे देखील डॉ. भेले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. भेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदिवासी संस्कृती, लोककला, लोकसाहित्याचे आपण जतन केले पाहिजे व नव्या पिढीने हा परंपरागत वारसा पुढे चालवला पाहिजे तरच लोकसाहित्याचे जतन होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मालवली काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. युवा कवी डॉ. बाळासाहेब लबडे व महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे निवेदक नितीन माधव यांनी या मैफिलीत रंगत भरली. यावेळी सादर करण्यात आलेल्या खारवी, आगरी, मालवणी, मराठवाडी, वैदर्भीय अशा विविध बोलीतील कवितांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना विविध बोलीभाषेचा आनंद अनुभवता आला. पावसावरची कवितांसह प्रेमावरच्या कविताही विद्यार्थ्यांच्या मनाला भुरळ पाडून गेल्या. तर शेतकर्‍यांच्या दु:खापासून तर मोबाईलच्या दुखण्यापर्यंतच्या अनेक कविता वास्तव जीवनाशी नातं जोडणार्‍या कविता ठरल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांनी प्रतिभेचे महत्व सांगून स्वरचित दोन कविता सादर केल्या. या कवितांनाही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वारली चित्रकलेच्या भित्तीपत्राचे डॉ. संदीप भेले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गौकुळ शिखरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक वाकडे यांनी केले तर आभार प्रा. बी. डी. मिरपगार यांनी मानले.

comments

About Rajtantra

Scroll To Top