आणखी एक टेम्पो पकडला
मनोर/प्रतिनिधी, दि. 30 : वनविभागाच्या कर्मचार्यांनी नुकताच दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीतून खैराची तस्करी करणारा टेम्पो पकडला असताना आज, सोमवारी पहाटे देखील मनोर वनपरिक्षेत्रात खैराची तस्करी करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे.
वनविभागाच्या कर्मचार्यांना पोळा गावच्या हद्दीत सर्वे क्र.29/1 मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज, पहाटे चार वाजताच्या सुमारास वनविभागाच्या गस्तीवर असलेल्या कर्मचार्यांना पोळा रस्त्यावर एक संशयीत टॅम्पो आढळून आला. यावेळी वनविभागाच्या कर्मचार्यांना पाहून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेम्पोचा पाठलाग करून तो अडविण्यात आला. मात्र अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक व इतर आरोपी टेम्पो सोडून पळून गेले. टेम्पोची पाहणी केली असता त्यात खैराचे ओंडके आढळून आले. खैराच्या ओंडके आणि टेम्पो असा एकूण अडीच लाख किंमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
मनोरचे वनक्षेत्रपाल तुषार काळभोर, वनपाल गोपाळ पडवळे, वनरक्षक रामकृष्ण सांगळे, साईनाथ कुवर, प्रणित नम व जे. डी. देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वनपरिक्षेत्र दहिसर आणि मनोर हद्दीत खैर तस्करांचा सुळसुळाट झाला असुन त्यामुळे खैराची झाडे दुर्मिळ होत चालली आहेत. आतापर्यंत दुर्वेस, सकवार आणि पोळा या ठिकाणी खैर तस्करी करणारी वाहने जप्त करून वनविभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. मात्र खैराची ही अवैध वृक्षतोड आणि तस्करी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण प्रेमी गणेश घोलप यांनी व्यक्त केले.
वनविभागाच्या कूप आणि संवेदनशील क्षेत्रात रात्रगस्त, पहारा वाढविण्यात येईल. स्थानिक ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून त्यांच्या सहभागातून अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी उपाययोजना करणार.
–तुषार काळभोर
वनक्षेत्रपाल, मनोर