विकासवाडीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी भाग्यवान! – संजीव जोशी

0
305

Kosbadराजतंत्र मिडीया
कोसबाड दि. २४: नूतन बाल शिक्षण संघाच्या विकासवाडी प्रकल्पात (कोसबाड हिल) नव्याने सुरु झालेल्या कला व वाणिज्य शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपण ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाला आहात. महाविद्यालय विना अनुदान तत्वावर असल्यामुळे तुम्ही अनुदानित संस्थेमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे येथे प्रवेश घेतला असणार. मात्र तुमच्या भाग्यात स्वातंत्र्यपूर्व काळाचा वारसा लाभलेल्या, पद्मभूषण ताराबाई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ यांच्या सहवासाने पवित्र झालेल्या ऐतिहासिक संस्थेमध्ये शिक्षण घेणे लिहिलेले असल्याने तुम्ही आज येथे आहात. येथून स्वतःचा सर्वांगीण विकास साधून मोठे व्हा आणि समर्थ नागरिक बना असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नव्याने सुरु झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त महेशभाई कारिया होते.
नूतन बाल शिक्षण संस्था अंगणवाडी या संकल्पनेची जनक असून मागील ६० वर्षांपासून कोसबाड येथे अंगणवाडी शिक्षिका ते प्राथमिक शिक्षक घडविण्याचे काम करीत आहे. संस्थेतर्फे आदिवासी व दुर्गम भागात अंगणवाड्या चालविण्याचे काम करते. परिसरात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे मोठे कार्य संस्थेने उभे केले आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी १० ते १२ किलोमीटर अंतरावर जावे लागते. ही गैरसोय लक्षात घेऊन संस्थेने चालू वर्षापासून कला व वाणिज्य शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले आहे. आज त्याचे औपचारिक उद्घाटन पार पडले व शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली.
उद्घाटन कार्यक्रमास सचिव दिनेश पाटील, पदाधिकारी सर्वश्री अशोक पाटील, सुधीर कामत, चंद्रेश जोशी, विनायक बारी, विजयकांत पांचाळ, व्यवस्थापक नाना कदम, मुख्याद्यापक दिलीप कदम, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य घुले उपस्थित होते. विश्वस्त कारिया यांनी संस्थेचा ऐतिहासिक वारसा विषद करुन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सचिव दिनेश पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष कारिया व प्रमुख पाहुणे जोशी यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमानंतर संजीव जोशी, सुधीर कामत, एस. आर. करंदीकर महाविद्यालयाचे प्राध्यापक रोमिओ मस्करेन्हास व पर्सी जामशेतवाला यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थ्यांना बोलते केले. निसर्गरम्य वातावरणातील प्रोजेक्टर पासून सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा हवेशीर वर्गखोल्या पाहून आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आपलेपणाची भावना पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपण योग्य शिक्षणसंस्थेमध्ये प्रवेश घेतल्याचे समाधान झळकताना दिसले.

Print Friendly, PDF & Email

comments