पोलीस भरतीच्या अमिषाने फसवणूक :

0
262

जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचार्‍याला अटक

राजतंत्र मिडिया/दि. 23 : भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रातील उमेदवारांना पालघर जिल्हा पोलीस दलात भरतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणार्‍या पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. तर यात त्याला मदत करणार्‍या अन्य एका आरोपीचा शोध पोलीसांकडून घेण्यात येत आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पोलीस कर्मचार्‍याने लातूर येथे सुरु असलेल्या भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्राला भेट देत येथील चाकुर जिल्ह्यातील रोहिना येथील रहिवासी असलेल्या दोन उमेदवारांना पालघर पोलीस दलात भरती करण्याचे आश्‍वासन देत एकाकडुन 2 लाख 30 हजार तर दुसर्‍याकडून 7 लाख असे 9 लाख 30 हजार रुपये उकळले होते. तसेच त्यांना पालघर पोलीस अधिक्षकांची बनावट सही करुन नियुक्तीचे पत्र दिले होते. याबाबत पोलीस अधिक्षकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पालघर स्थानिक गुन्हे शाखेला याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते होते. तपासादरम्यान पालघर पोलीस मुख्यालयातील सदर पोलीस शिपायाचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. तर याकामी त्याला मदत करणार्‍या अन्य एकाचा शोध पोलीसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघा जणांविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

 

Print Friendly, PDF & Email

comments