दिनांक 17 February 2020 वेळ 12:07 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोरमध्ये रानभाजी महोत्सव संपन्न!

मनोरमध्ये रानभाजी महोत्सव संपन्न!

प्रदर्शनात 65 प्रकारच्या रानभाज्या, फळे आणि औषधी वनस्पतींचा समावेश

MANOR RANBHAJIनावीद शेख/मनोर, दि. 21 : आदिवासी एकता मित्र मंडळामार्फत मनोरच्या शंकर मंदिर सभागृहामध्ये शनिवारी (दि.21) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 65 प्रकारच्या रानभाज्या, रान फळे आणि औषधी वनस्पती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. येथील आदिवासी समाजाची वस्ती जंगल, डोंगर, दर्‍या-खोर्‍या§मध्ये आहे. पावसाळ्यात या जंगलात मोठ्या प्रमाणात रानभाज्या, फळे आणि औषधी वनस्पती तयार होतात. या रानभाज्यांचे आहारातील महत्व, औषधी गुणधर्म आणि त्यांची माहिती शहरातील नवीन पिढी तसेच बिगर आदिवासी बांधवांना व्हावी या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी सांगितले.

या महोत्सवात करटोल, लोती, माट भाजी, अंबाडा, रान अळू, टेटवालीची शेंग या रानभाज्या, अळू, उंबर, काकड ही फळे, आणि खुरासनाचा पाला, मोखा, अंबाडा या औषधी वनस्पती, असे 65 प्रकार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तसेच करवंदाचे लोणचे, खरशेंगाचे लोणचे, मिरची चटणी, खुरासणीची चटणी, तिळाची चटणी आणि उखळीमध्ये कांडून तयार केलेले तांदूळ विक्रीस ठेवण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला. मनोर परिसरातील आदिवासी बांधव, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी या महोत्सवाला भेट दिली.

विक्रमगड तालुक्यातील कर्‍हे गावातील महिला उद्योग मंडळाच्या महिलांनी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या रानभाज्या, फळे आणि औषधी वनस्पती उपलब्ध करून दिल्या होत्या. या महिला उद्योग मंडळातील महिला दरवर्षी पाच ते सहा प्रदर्शनात भाग घेतात. प्रत्येक प्रदर्शनातून एक महिलेला 700 ते 800 रुपये उत्पन्न मिळतं. रानभाज्या आणि वनस्पती विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास आदिवासी भागातील महिलांना उत्पनाचे साधन निर्माण होईल, अशी आशा यावेळी महिला उद्योग मंडळाच्या सदस्य सविता हिलीम यांनी व्यक्त केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top