दिनांक 22 September 2019 वेळ 5:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यातील 21 शाळांच्या इमारती पाडण्याचा प्रस्ताव मंजूर

मोखाड्यातील 21 शाळांच्या इमारती पाडण्याचा प्रस्ताव मंजूर

शेलमपाडा शाळेची कोसळलेली इमारत

शेलमपाडा शाळेची कोसळलेली इमारत

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 20 : मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याच्या प्रस्तावाला पालघर जिल्हा परिषदेकडून तत्वतः मंजूरी देण्यात आलेली आहे. शेलमपाडा येथील दोन वर्ग खोल्या मंगळवारी रात्री अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाल्यानंतर इतर शाळांच्या धोकादायक इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला चालना मिळाली आहे.

तालुक्यातील 38 शाळागृहे धोकादायक असून कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषदेच्या मोखाडा बांधकाम उप विभाग आणि शिक्षण विभागीकडील प्रस्तावा अंती तालुक्यातील 21 इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला पालघर जिल्हा परिषदेकडून मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आलेली आहे. यात पोशेरा, वाकडपाडा (1) व (2), तेलीउंबरपाडा (1) व (2), निळमाती, दांडवळ, खोच, किनिस्ते, ब्राम्हणगाव, वडपाडा (वाशाळा), ठवळपाडा, डोल्हारा (1), बेहटवाडी, कुर्लोद (3), शेलमपाडा (1), गोमघर (1) व (3) आणि टाकपाडा आदी 21 जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. यातील काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था आहे. मात्र बहूतांश ठिकाणी वर्गखोल्यांची निर्मिती झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण देता येणार नसल्याची परिस्थिती आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेकडून या प्रस्तावाला तत्वतः मंजूरी मिळालेली असली तरी आणखी बर्‍याचशा अडथळ्यांच्या शर्यतीतून या प्रस्तावाला जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवितावर टांगती तलवार कायम आहे.

ठवळपाडा, गोमघर, शेलमपाडा व बहूतांश शाळा गावातच किंबहूना गावालगतच भरविल्या जात असल्याने शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना खेळण्याचे ठिकाण झालेल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या वेळेनंतरही विद्यार्थ्यांचा राबता शाळा परिसरातच असतो. त्यातच अशा धोकादायक शाळांची पडझड झाल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेलमपाडा दुर्घटनेच्या धर्तीवर पालकांकडून केली जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top