दिनांक 22 September 2019 वेळ 4:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूत शेतकरी संघटनेचे रेल रोको आंदोलन

डहाणूत शेतकरी संघटनेचे रेल रोको आंदोलन

सरकार शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे झुकली! -खासदार राजू शेट्टी

DAHANU SHETKARI AANDOLAN1शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 18 : महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकर्‍यांनी मागील दोन दिवसांपासून दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. बाजारात दुधाचा पुरवठा होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांतर्फे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने चालू आहेत. त्यातच काल, मंगळवारी गुजरातहून रेल्वेमार्गे मुंबईला दुधाचा पुरवठा करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्याने याविरोधात डहाणूत रेलरोको करण्यात आला.

राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्याने राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला या आंदोलनाची झळ पोहोचू नये म्हणून शासनाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्यातील दुध रेल्वेने मुंबई शहराला पुरविण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू होते. काल दुपारी 3 वाजता रेल्वेतर्फे 44 हजार लिटर क्षमतेच्या 10 डब्ब्यांमधून एकूण 4 लाख 44 हजार लिटर दूध अहमदाबाद पॅसेंजर गाडीने मुंबईला पाठविण्यात येणार असल्याची माहिती ट्विटद्वारे देण्यात आली. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांसह रेल लोको आंदोलनासाठी डहाणू रेल्वे स्थानकावर सकाळी दहा वाजता आले. अहमदाबाद पॅसेंजर रेल्वे स्थानकात आल्यावर मोठ्याने घोषणा देत आंदोलनाला सुरुवात झाली. परंतु सदर गाडीला दुधाचे डबे जोडले नसल्याने गाडी सोडण्यात आली.

यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी रेल्वे अंगावर घेण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे झुकले आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी माझे प्रयत्न चालूच राहतील. सरकारला दुधासाठी शेतकर्‍यांच्या दारातच जावे लागेल. DAHANU SHETKARI AANDOLAN
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा सचिव मोईझ शेख उपस्थित होते. यावेळी आरपीएफ, रेल्वे पोलीस, ग्रामीण पोलीस, रॅपिड फोर्सचे अधिकारी व कर्मचारी यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संध्याकाळी 4.15 वाजता डहाणू स्थानकांत येणार्‍या सौराष्ट्र एक्सप्रेसला दुधाचे डबे जोडले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पुन्हा संध्याकाळी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, गुजरातमधुन दुधाची आयात करणार्‍या बोईसर एमआयडीसीमधील दुध व दुधाचे पदार्थ बनविणार्‍या वसुंधरा कंपनीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी भेट देत दूध उत्पादकांचे आंदोलन संपेपर्यंत गुजरातमधुन दुधाची आयात थांबवा, अशी विनंती कंपनी प्रशासनाला केली होती. अन्यथा दुधाचे टँकर आडवे करु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top