दिनांक 22 September 2019 वेळ 5:19 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दाबोसा धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला दोन महिन्यापुर्वीच झाले होते रस्त्याचे काम

दाबोसा धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला दोन महिन्यापुर्वीच झाले होते रस्त्याचे काम

DABOSA RASTAप्रतिनिधी
             जव्हार, दि.१६ : तालुक्यातील प्रसिद्ध अशा दाबोसा धबधब्याकडे जाणारा एकमेव रस्ता रविवारी झालेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह पर्यटकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर अवघ्या 2 महिन्यांपुर्वीच बांधण्यात आलेला हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने रस्त्याच्या बांधकामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असुन निकृष्ट कामाचा आरोप होत आहे.
             तालुक्यातील सुंदर व निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून दाबोसा धबधबा प्रसिद्ध आहे. पावसाला सुरवात झाल्यावर पर्यटकांची पाऊले आपोपाप या धबधब्याकडे वळतात. दाबोसा पर्यटनस्थळी रोजच नाशिक, पालघर, ठाणे तसेच गुजरात व सिल्वासा अशा ठिकाणांहून येणार्‍या पर्यटकांची मोठी गर्दी असते. तर शनिवार आणि रविवारी येथे तुफान गर्दी पहावयास मिळते. मात्र रविवारी रात्री पावसामुळे दाबोसाकडे जाणारा एकमेव रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे पर्यटकांना जव्हार-सेलवास या मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून 2 किमी पायी चालत दाबोसा गाठण्याची वेळ आली आहे. मुख्यत: दाबोसा गावातील ग्रामस्थांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
            दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील अरुंद व खराब रस्त्यावरुन प्रवास करताना अनेक पर्यटकांच्या वाहनांना अपघात घडल्याच्या घटना घडल्या होत्या. म्हणून पर्यटकांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 कोटी रुपये खर्च करून मे महिन्याच्या अखेरीस रस्त्याचे डांबरीकरण आणि मोर्‍यांचे काम केले होते. मात्र रविवारच्या रात्री रस्त्यासह मोरीचा खालचा भाग मोठ्याप्रमाणात वाहून गेल्याने रस्त्याच्या ठेकेदारासह सार्वजनिक बांधाकम विभागाच्या निकृष्ट कामाचे वाभाडे निघाले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण घाईगाईने केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला असुन मोरीचे काम करताना निव्वळ दगड व मातीचा वापर केल्याचे रस्ता वाहून गेल्यानंतर समोर आले आहे.
धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदी
           मागील आठवड्यात वसई तालुक्यातील चिंचोटी धबधब्यावर 50 पर्यटक अडकून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे पालघर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीही दाबोसा धबधब्याच्या डोंगरावरून बघ्यांची गर्दी आजही तशीच आहे. तसेच चार वर्षापूर्वी दाबोसा धबधब्यात बुडून गुजरातच्या चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आजही दाबोसा धबधब्याजवळ पोलीस तैनात असून एकाही पर्यटकाला खाली उतरण्यास मुभा देण्यात येत नाही.

comments

About Rajtantra

Scroll To Top