दिनांक 17 February 2020 वेळ 12:25 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोर शहरातील रस्ते झाले खड्डेमय

मनोर शहरातील रस्ते झाले खड्डेमय

>> सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता दुरुस्तीस नकार

MANOR RASTE

प्रतिनिधी/मनोर, दि. 13 : पालघर-मनोर राज्यमार्गाच्या मनोर हद्दीतील रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठं-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी आणि वाहनचालकांना खड्ड्यांतून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पालघर-मनोर मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करण्यास नकार दिला आहे.

मनोर शहरातील शिवसेना जिल्हा कार्यालयाशेजारील गटार तुंबल्याने पावसाचे पाणी पालघर-मनोर रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे या कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पालघरला जिल्हा मुख्यालय झाल्यापासून पालघर-मनोर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात इमारतींची बांधकामे झाल्याने मनोरची लोकसंख्या वाढली आहे. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे मनोर शहरात नेहमीच वाहन कोंडी असते. त्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एखादे वाहन वेगाने गेल्यास रस्त्यावरील पाणी दुकानात येत असल्याने स्थानिक दुकानदारही हैराण झाले आहेत.

गटार दुरुस्त करून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा करावा. मनोर शहरातील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान पालघर चार रास्ता ते मस्तान नाका हा मार्ग मार्च 2017 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी असमर्थता व्यक्त केली.

ग्रामपंचायतीमार्फत रस्त्यावर पडलेले खड्डे दोन वेळा बूजविण्यात आले होते. रास्ता दुरुस्तीसाठी संबधित विभागाला पत्रव्यवहार सुरू आहे.
-कैफ रईस,
उपसरपंच, ग्रामपंचायत मनोर

 
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने रास्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले पाहिजे.
-रत्नदीप एडवनकर,
माजी ग्रामपंचायत सदस्य, मनोर

 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता दुरुस्ती तातडीने करावी. यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
-संतोष जनाठे,
सरचिटणीस, भाजप, पालघर जिल्हा

 

comments

About Rajtantra

Scroll To Top