दिनांक 17 July 2019 वेळ 3:50 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील पोलीस पत्रकार तिढा कायम

पालघर जिल्ह्यातील पोलीस पत्रकार तिढा कायम

POLICE PATRAKAR TIDHAराजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : पालघर पोलिसांनी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत पालघर पोलीस स्टेशनमध्ये जेल भरो आंदोलन केल्यानंतरही गुन्हा मागे घेण्यास पोलीसांनी नकार दिल्याने तिढा कायम राहिला आहे. असे असले तरी पत्रकारांवर गुन्हा दाखल करताना यापुढे अधिक दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी दिले आहे.

21 जूनच्या रात्री दरोड्याच्या गुन्ह्यासंदर्भात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हुसेन खान आणि राम परमार यांच्या विरोधात पालघर पोलिसांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला होता. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पालघर पोलिसांच्याविरोधात शुक्रवारी (6 जुलै) आंदोलन छेडले. या आंदोलनात सहभागी झालेल्या पत्रकारांनी आपणही पोलीस स्टेशनच्या आवारात चित्रीकरण करतो, आम्हाला पण अटक करा, अशी मागणी केली.

पत्रकारांच्या शिष्टमंडळाला पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण सामोरे गेले. या प्रकरणाचा तपास सुरू असून जे सत्य समोर येईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले. या गुन्ह्यातील महत्वपूर्ण पुरावा असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजची हार्ड डिस्क फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली असून त्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी अधिक स्पष्टता येईल असे ते म्हणाले. पोलीसांप्रमाणे पत्रकार देखील समाजासाठी काम करत असून पोलीसांच्या मनात पत्रकारांविषयी कुठल्याही प्रकाराची कटूता नसल्याची ग्वाही सिंगे यांनी यावेळी दिली.

पहिल्यांदाच प्रमुख पत्रकार संघटना एकत्रित येऊन शक्ती प्रदर्शन : पत्रकारांवर चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ प्रथमच पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, पालघर जिल्हा पत्रकार संघ, प्रेस क्लब ऑफ वसई विरार, वसई विरार महापालिका पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन अशा प्रमुख संघटना एकत्र येत त्यांनी हे आंदोलन छेडले.

आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विभागीय सचिव संतोष पेरणे, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला.

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी पत्रकारांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे नागपूर येथे भेट देऊन सुपूर्द केले. या विषयी तातडीने चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्याकडे याबाबत चर्चा केल्यानंतर, त्यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी व पत्रकार प्रतिनिधींसह 9 जुलै रोजी नागपूर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top