दिनांक 23 February 2019 वेळ 8:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे नगरसेवक पद धोक्यात?

डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे नगरसेवक पद धोक्यात?

> मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात अपयश

NIMIL GOHILराजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : डहाणू नगरपरिषदेचे आरोग्य सभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. निमिल हे डिसेंबर 2017 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग 6 अ मधून निवडून आले होते. त्यांना नियमानुसार 6 महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ही मुदत संपल्याने निमिल यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

निमिल यांनी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विमुक्त जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. या जात प्रमाणपत्रामध्ये त्यांची जात हिंदू – सलाट अशी नमूद आहे. मात्र निमिल यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या पुराव्यांमध्ये निमिल यांच्या वडिलांची जात हिंदू- कढिया अशी नमूद आहे. ही जात इतर मागास वर्गामध्ये मोडते. त्यामुळे जात पडताळणी समितीने निमिल यांचे प्रमाणपत्र रोखून धरले असून वडिलांच्या आणि निमिल यांच्या जातीमधील तफावतीवर प्रश्‍न उपस्थित केला आहे. साहजिकच या तृटीमुळे निमिल यांना मुदतीत जात पडताळणी पत्र प्राप्त करता आलेले नाही. मुदत संपल्यामुळे डहाणू नगरपालिका प्रशासनाने त्यांना 28 जून रोजी नोटीस देखील बजावली आहे. ही नोटीस बजावली जाताच आता त्यांच्यासमोर पराभूत झालेले उमेदवार शशिकांत बारी यांनी देखील वकील मोहन वंजारी यांच्यामार्फतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निमिल यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान निमिल गोहिल यांनी त्यांचे विमुक्त जातीचे प्रमाणपत्र अमान्य झाल्यानंतर त्वरित उप विभागीय अधिकार्‍यांकडे अर्ज करुन इतर मागासवर्गीय असल्याचे नवे प्रमाणपत्र मिळवून ते जात पडताळणी समितीकडे सादर केले आहे. यावर आमदार आनंद ठाकूर यांनी एकाच व्यक्तीला दोन विभिन्न जातीची जात प्रमाणपत्रे कशी दिली जातात? असा प्रश्‍न उपस्थित करुन जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

माझी जात विमुक्त जातीमध्ये समाविष्ट नसून इतर मागासवर्गीय आहे असे जात पडताळणी समितीने कळविल्यामुळे मी नव्याने इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र मिळवून ते समितीकडे सादर केले आहे. या आधी मला चुकीचे प्रमाणपत्र दिले गेले, त्यात माझा दोष नाही. – निमिल गोहिल

comments

About Rajtantra

Scroll To Top