दिनांक 19 February 2019 वेळ 4:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांचे मानधन वर्षभरापासून प्रलंबीत

जिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांचे मानधन वर्षभरापासून प्रलंबीत

> तांत्रिक सहाय्यकही वंचित; > 50 लाखांचे मानधन थकले; > मानद कर्मचार्‍यांची ओढातान

Salaryदीपक गायकवाड/मोखाडा, दि. 3 : पालघर जिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांना मागील वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. तर 24 तांत्रिक सहाय्यकांचेही मानधन अटकलेले आहे. रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांच्या मानधनाबाबत आयूक्त कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याने या मानद कर्मचार्‍यांची मोठी आर्थिक ओढातान होत आहे.

जिल्ह्यातील अत्यल्प मानधनावर कार्यरत असलेल्या 471 रोजगार सेवकांचे एकुण 48 लाख 67 हजार 791 रुपये एवढे अवाढव्य मानधन हे तब्बल वर्षभरापासून सरकार दरबारी अडकुन पडले आहे. त्याचबरोबर 24 तांत्रिक सहाय्यकांचेही मानधन अदा करण्यात आलेले नाही. रोजगार सेवकांचे मानधन हे मनुष्यदिन निर्मितीवर ठरत असते. अशा परिस्थितीत अत्यंत तुटपुंज्या मानधनासाठी वर्षभराची प्रदीर्घ प्रतिक्षा करावी लागते. ही परिस्थिती दुर्गम भागातील रोजगार निर्मितीसाठी घातक आहे. रोजगार निर्मितीचा महत्वाचा दुवा असलेला रोजगार सेवकच उपाशी ठेवण्याचे काम संबंधीत प्रशासनाकडून केले जात आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्थानिक मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करूनही आमच्याच कुटूंबाच्या पोटाला टाच येत असल्याने आम्ही काम कसे करायचे, अशी प्रतिक्रिया एका निष्कांचन कर्मचार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

याबाबत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नरेगा कक्षाशी संपर्क साधला असता शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर काही अडचणी असल्याने मानधन अदा करण्यात अडचण येत आहेत. शुक्रवारी या संदर्भात नरेगा आयुक्त कार्यालयाशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली असून लवकरच मानधन अदा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र जव्हार, मोखाडा आदी दुर्गम तालुक्यांमधुन मानधनाची रक्कम उपलब्ध झाली तरी संबंधित संकेतस्थळावरील अडचणीमुळे मानधन अदा करण्यात विलंबच होणार असल्याचे पंचायत समितीच्या नरेगा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील रोजगार सेवकांना आणखी किती दिवस मानधनाची वाट पाहवी लागणार असा प्रश्‍न पडला आहे. मानधन प्रलंबित असल्याने आर्थिक ओढातान होत असून आम्ही खायचे काय? असा प्रश्‍न जव्हार, मोखाडासारख्या अतिदुर्गम तालुक्यातील रोजगार सेवकांकडून विचारला जात आहे.

वेतन वितरण प्रक्रियेदरम्यान संबंधित संकेतस्थळावर तांत्रिक अडचण उद्भवत होती. परंतू आता सर्व सुरळीत झाले असून येत्या आठवडाभरात सर्व मानधन ऑनलाईन जमा होईल.
संभाजी पावरा, नायब तहसीलदार, नरेगा कक्ष, पालघर

comments

About Rajtantra

Scroll To Top