कुडूस येथील विद्यार्थ्यांनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ पिशव्या

0
221
विद्यार्थ्यांनी तय्यार केलेल्या कापडी पिशव्या .
विद्यार्थ्यांनी तय्यार केलेल्या कापडी पिशव्या .

अशोक पाटील/कुडूस, दि. 2 : महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर नागरिकांमध्ये प्लास्टिक पिशवीला पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतरच बंदी योग्य होती, अशी एकच चर्चा रंगली, मात्र हे रडगाणे गाण्यारांना कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी नवा पर्याय प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील जुन्या टाकाऊ कपड्यांपासून टिकाऊ कापडी पिशव्या बनवून त्या शिक्षक व पालकांच्या हाती बाजार रहाटीसाठी दिल्या. यामुळे पालकात व शिक्षकात कापडी पिशव्यांअभावी आलेले नैराश्य काहीसे कमी झाले व सर्वांनी या कापडी पिशव्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शाबासकी दिली.

या उपक्रमामुळे प्लास्टिक पिशवीला पर्याय तर मिळालाच त्यासोबतच विद्यार्थ्यांना पिशव्यांच्या विक्रीनंतर स्वमिळकीतीतून मिळालेल्या पैशांचा शालेय गरजा भागवण्यासाठी देखील उपयोग झाला. पालक स्वतः सह शेजार्‍यांनाही या पिशव्या विकत घेण्यास प्रोत्साहन देवू लागल्याने सर्वच विद्यार्थी आनंदले आहेत. शाळेचे संस्थाचालक मुस्तफा मेमन व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या या उपक्रमाबद्दल शाबासकी दिली आहे. यात पडीक साड्या, बनियान, शर्ट व फूल पॅन्डस् अशा टाकाऊ कपड्यांचा समावेश आहे. दरम्यान, याचा कित्ता इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनी गिरवावा व पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करावी, असे आवाहन मेमन यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments