कासटवाडी गावाजवळ अपघातांची मालिका, आतापर्यंत २७ जखमी तर एका महिलेचा मृत्यू. 

0
20
IMG_20180626_141010प्रतिनिधी
             जव्हार, दि. २६ : जव्हार- मनोर महामार्ग आणि मुंबई ठाण्याकडे जाताना जव्हार शहरापासून अगदी ३ किमी अंतरावर असलेल्या कासटवाडी गावाजवळ वाहनांचे ब्रेक निकामी होऊन शुक्रवारपासून ते सोमवार असे सतत चार दिवस अपघात घडले आहेत. यात आतापर्यंत एका महिलेचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत.
             कासटवाडी गावाजवळ घडणाऱ्या सततच्या अपघातांने गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कासटवाडी ग्रामस्थांच्या म्हणन्यानुसार  याच वर्षी डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र डांबरीकरण रस्ता करतांना ठेकेदाराने ऑइलमिक्स डांबर वापरल्यामुळे रस्ता गुळगुळीत होवून, पाऊस सुरु असताना वाहनांचे ब्रेकफेल होवून अपघात घडत आहेत.
            कासटवाडी गावाजवळ ५०० मीटर अंतरात हे सर्व अपघात घडले. शुक्रवारी चालकाचा जीप वरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या महिलेला उडविले. तर त्याच ठिकाणी शनिवारी दुसऱ्या दिवसी बस झाडावर आदळून बसचा अपघात झाला.  रविवारी तिसऱ्या दिवशी वाडा जव्हार बस चालत्या पिकअपला येवून धडकली. तर सोमवारी संध्याकाळी ट्रक आणि बसमधील अपघात थोडक्यात बचावला. दरम्यान  पाऊस सुरु असतांना बाईक स्वारांचे लहान मोठे अपघात येथे झाल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
           कासटवाडी गावाजवळ गतिरोधक नाही. त्यातच रस्ता सरळ असल्यामुळे येणारी वाहने वेगाने येतात. त्यामुळे हे अपघात घडत असल्याचे सांगत बांधकाम विभागाने कासटवाडी गावाजवळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. याच ठिकाणी वन विभागाचा तपासणी नाका आहे. मात्र या नाक्यावर वन विभागाचा एकही अधिकारी किंवा  कर्मचारी उपस्थित राहत नाही. वन विभागाचा तपासणी नाका सुरु असता, तर वाहनांवर थोडेफार नियंत्रण असते, असेही ग्रामस्थानकडून सांगण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी पोलीस चौकी असावी जेणेकरून वाहकावर नियंत्रण राहील अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
           कासटवाडी गावाजवळ घडलेल्या अपघातांना जबाबदार बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, अन्य  अधिकारी  आणि संबंधित भ्रष्ट ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून केली जात आहे. तर जव्हार- कासटवाडी, मुंबई, मनोर आमदाबाद महामार्ग, या रस्त्याला जोडणारा हा रस्ता मार्च २०१८ ला महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. अशी माहिती बांधकाम विभागाकडून मिळाली.
Print Friendly, PDF & Email

comments