दिनांक 22 August 2019 वेळ 2:37 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पत्रकारांच्या विरोधात पोलीसांची दडपशाही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जुलमी कारवाई

पत्रकारांच्या विरोधात पोलीसांची दडपशाही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जुलमी कारवाई

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यूज नेटवर्क
पालघर, दि. २४ : कथीत दरोडेखोरांना अटक केल्याप्रकरणी बातमी घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या आज तक ह्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्स ह्या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी राम परमार यांना पालघर पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत अटक केली आहे. ह्या कारवाईच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. पत्रकारांना धक्काबुक्की करुन उलट खोटी तक्रार दाखल करणाऱ्या पोलीस उप निरीक्षक सय्यद याच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि पोलीस अधिक्षकांची उचलबांगडी करावी अशी मागणी विविध पत्रकार संघटनांकडून केली जात आहे.
गुरुवारी (दि.२१) रात्री पालघर मनोर दरम्यानच्या रस्त्यावर वाघोबा खिंडीत वाहनांवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. दगडफेक करणाऱ्या आरोपीच्या शोधात गेलेल्या पालघर पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी संशयीतांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. आरोपींनी पोलीसांवर गोळीबार केल्यामुळे प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याचा पोलीसांचा दावा असला तरी पोलीसांनी निरपराध आदिवासींवर गोळीबार केल्याचे आरोप होत आहेत. गोळीबार प्रकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले असताना वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी हुसेन खान आणि राम परमार हे पत्रकार पोलीस स्टेशनला गेले होते.
प्रथम पोलीस स्टेशनला व्हिडिओ चित्रण करण्यासाठी गेलेल्या हुसेन यांना पोलीस उप निरीक्षक सय्यद यांनी कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्या पाठोपाठ पोहोचलेल्या राम परमार यांनी हा प्रकार पाहून सय्यद यांच्या बेकायदेशीर वागणूकीबाबत नापसंती व्यक्त केली आणि याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला. तरीही पोलीसांनी हुसेन यांना डांबून ठेवले.
राम परमार हे हुसेन यांच्या विरोधातील अपराधाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने प्रकरण अंगाशी येईल या भीतीने त्यांना देखील गुन्ह्यात अडकवण्यात आले. मध्यरात्री पोलीसांनी राम यांच्या घरी जाऊन अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्यांना अटक केली. दोन्ही पत्रकारांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दोन्ही पत्रकारांची ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पालघर पोलीसांचे वर्तन संशयास्पद:
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविलेले आहेत. पालघर पोलीस स्टेशनमध्ये देखील कॅमेरे बसविलेले आहेत. पत्रकारांनी सरकारी कामात खरोखरच अडथळा आणला असेल तर सी.सी.टी.व्ही. फूटेज दाखवा अशी मागणी अन्य पत्रकारांनी केली असता अद्ययावत सुखसोयींनी युक्त अशा पालघर पोलीस स्टेशनमधील सी.सी.टी.व्ही. यंत्रणा नादुरुस्त असल्याचा दावा कबाडी यांच्यातर्फे करण्यात आला. टेक्नोसेव्ही समजल्या जाणाऱ्या आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविणाऱ्या पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांच्या खूर्चीखाली असलेल्या पालघर पोलीस स्टेशनची सी.सी.टी.व्ही. बिघडली असल्याचा दावा संशयास्पद मानला जात आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून निराशा:
ह्या प्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांची भेट घेतली असता त्यांनी निराशा केली. उलट शिष्टमंडळात आलेल्या काही पत्रकारांच्या विरोधात पोलीसांकडे तक्रारी आहेत असे सांगून जखमेवर मिठ चोळले.
पोलीस उप निरीक्षक सय्यद यांची गाडी सायडींगला:
वादग्रस्त पोलीस उप निरीक्षक सय्यद यांची पालघर पोलीस स्टेशनमधून तडकाफडकी पोलीस मुख्यालयात राखीव दलात उचलबांगडी करण्यात आली आहे. किरण कबाडी यांना मात्र अभय देण्यासाठी ह्या प्रकरणाचा तपास केळवे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

 

” पोलीसांनी हे इंग्रजांचे राज्य नसून आपण लोकशाही व्यवस्थेतील जनतेचे सेवक आहोत ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. ह्या देशामध्ये मिडीयामुळे लोकशाही सुरक्षित राहिली आहे. पोलीस जर पत्रकारांशी असे वागत असतील तर सामान्य लोकांचे काय होईल? पोलीसांची ही कारवाई दुर्दैवी असून त्याचा त्रिवार निषेध नोंदवित आहोत. पत्रकारिता अशा जुलमाने झुकणारी नाही ह्याची पोलीसांनी जाणीव ठेवावी! ” –
संजीव जोशी,
अध्यक्ष – मराठी पत्रकार परिषद, पालघर जिल्हा

comments

About Rajtantra

Scroll To Top