
मनोर, ता.१७ : मनोरच्या मंडळ अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक असलेलेदाखले वाटप शिबीर नुकतेच पार पडले.
जून महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जातीचे दाखले, उत्पनाचे दाखले आणि नॉन क्रिमिकलेयर सारख्या दाखल्याची आवश्यकता भासते. दहावी बारावीचे निकालाच्या तारखांमध्ये जास्त अंतर नसल्याने तहसीलदार कार्यालयात दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांची झुंबड उडते. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता महसूल विभागाच्या प्रत्येक मंडळ अधिकारी कार्यालयात दाखले वाटप शिबिरं आयोजित करण्यात येत आहे.
या अभियाना अंतर्गत मनोरच्या मंडळ अधिकारी कार्यालयात दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला मनोर मंडळ परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात वार्षिक उत्पन्नाचे १००, जातीचे ६ आणि नॉन क्रिमिलेयर १ असे एकूण १०७ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी वसंत बारवे, तलाठी सदानंद भोईर, नितीन सुर्वे, अनंता पाटील, जस्पिन गमज्या, अशोक अहिरे आणि परिसरातील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.