दिनांक 23 July 2018 वेळ 3:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पोलीस अधिकाऱ्याच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सर्वपक्षीय आक्रमक 

पोलीस अधिकाऱ्याच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सर्वपक्षीय आक्रमक 

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
             वाडा, दि.१५ : वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार सुरु आहे. तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आक्रमक झाले असून शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी सर्व पक्षीय संघर्ष समितीने पालघरच्या पोलीस अधिक्षकांकडे एका तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे.
         शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश पटारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रोहीदास पाटील, कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष कैलास पाटील, मनसेचे तालुकाप्रमुख कांतीकुमार ठाकरे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील, तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ शिंगे यांची भेट घेऊन सुदाम शिंदे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची लक्तरे त्यांच्या कानावर घातली.
              सुदाम शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जनतेला वेठीस धरले आहे. निष्पाप नागरिकांवर ते खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. अलिकडेच वाड्यात एका महिलेची छेड काढणाऱ्या ट्रक चालकाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात ह्या घटनेशी कोणताही संबंध नसलेल्या काही निष्पाप तरूणांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांवर ॲट्रॉसिटी  सारखा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तर गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या  रिलायन्स कंपनी विरोधात एखाद्या बाधित शेतकऱ्याने नुकसान भरपाईकरिता आवाज उठवला तर त्या शेतकऱ्याला दमदाटी करून जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या पोलीस निरीक्षक शिंदे  देत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
             तालुक्यातील भंगाराचा  धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर त्यांचे साटेलोटे आहे. तर लोखंडाची वाहतूक करणाऱ्या चालकांकडून रात्री नाक्यावर पोलीस उभा करून खुलेआम वसुली केली जाते असा आरोप निवेदनात केला आहे. तर तालुक्यातील एका पोलीस पाटलाला विनाकारण काही तास पोलीस कोठडीत डांबून ठेवले होते. वाड्यातील आदिवासी नागरिकांचा घरगुती किरकोळ वाद झाला तर दोन्ही गटाच्या आठ ते दहा जणांवर गुन्हे दाखल करून कोठडीत टाकले गेले. अलिकडेच तोरणे इस्पात या कारखान्यात भट्टीचा स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांनी चांगलेच हात धुतल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे.
             मनमानी व भ्रष्ट कारभार करणाऱ्या शिंदेंमुळे पोलीस खात्याची बदनामी होत असल्याने त्यांची तत्काळ येथून बदली करावी अन्यथा जनआंदोलन छेडू असा गंभीर इशारा सर्व पक्षीय संघर्ष समितीने दिलेल्या तक्रारीत दिला आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाडा पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आला असून पोलीस अधीक्षक  काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पोलीस अधिक्षकांकडे केली तक्रार; बदलीची केली मागणी
पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा भ्रष्ट कारभार सुरु असून दलालांचा राबता
त्यांच्या कार्यालयात असतो. दलाल तासनतास त्यांच्या कार्यालयात बसून
असतात. पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज बघितल्यास हे सर्व उघड होईल.
दिलीप पाटील
अध्यक्ष – काॅग्रेस वाडा तालुका
शिंदे हे आपल्या पदाचा गैरवापर करीत असून प्रत्येकाला एन्काऊंटर  करण्याची
धमकी देतात. मी अठरा एन्काऊंटर  केले आहेत. अशी उघड धमकी देतात.
जितेश पाटील
अध्यक्ष – स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा .
सामान्य नागरिकाला कोणत्याही मध्यस्थाशिवाय पोलीस ठाण्यात प्रवेश दिला जात
असून प्राधान्याने त्यांच्या तक्रारी नोंदवल्या जातात. वस्तुस्थितीला धरून कायदेशीर
कारवाई होत असल्याने काहींचे हितसंबध दुखावले असल्याने असे निराधार आरोप होत आहेत.
सुदाम शिंदे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे

comments

About Rajtantra

Scroll To Top