दिनांक 19 February 2019 वेळ 4:16 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आयोजकांविना पार पडली कुडूसची इफ्तार पार्टी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी

आयोजकांविना पार पडली कुडूसची इफ्तार पार्टी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी

KUDUS IFTARप्रतिनिधी :
कुडूस, दि. 15 : तालुक्यातील कुडूस पोलीस दूरक्षेत्राच्या प्रांगणात दरवर्षी येथील पोलीसांतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कुडूससह वाड्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी इफ्तार पार्टीला उपस्थित न राहिल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयोजकांविना कुडूसची इफ्तार पार्टी पार पडल्याची चर्चा उपस्थित कार्यकर्त्यांत होती.
वाडा पोलीसांकडून दरवर्षी तालुक्यात वाडा व कुडूस अशा दोन ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. दोन्ही ठिकाणी मुस्लिम व हिंदू बांधव मोठ्या संख्येने या पार्टीसाठी हजर असतात. इफ्तार पार्टीतून येथे दोन्ही धर्माच्या ऐक्याचे प्रतिक पाहावयास मिळते. यंदा देखील कुडूस येथे गुरूवारी (दि. 14) सायंकाळी कुडूस पोलीस दूरक्षेत्राच्या प्रांगणात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या पार्टीला कुडूस पोलीस दूरक्षेत्राचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच पोलीस निरीक्षक किंवा तत्सम अधिकारी इफ्तार पार्टीला उपस्थित नसल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. इफ्तार पार्टी संपता संपता एका महिला पोलीस अधिकार्‍याने हजेरी लावली.
इफ्तार पार्टीत बोलताना ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी पुन्हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक पाहावयास मिळाल्याचे म्हटले. श्रीकांत भोईर यांनी रोजा सर्व शरीराचा असला पाहिजे असे सांगून नुसते जेवण वर्ज करून रोजा होता कामा नये तर डोळ्यांनी चांगले पहा, हाताने चांगले काम करा तसेच काम, क्रोध, मोह, मत्सर या सर्वांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच रोजा असे सांगितले. मुस्लिम समाजाचे नेते मुस्तफा मेमन यांनी यावेळी रमजानचे महत्व विषद केले.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, भाजपचे नेते निलेश सांबरे, कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, गोविंद पाटील, वाडा पंचायत समितीचे उपसभापती मंगेश पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, माजी उपसभापती मंगेश पाटील, रामदास जाधव, अशोक पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समाजाचे नेते इरफान सुसे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. पार्टीस मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top