दिनांक 20 January 2019 वेळ 8:43 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : नाटक जत्रेत रंगले लहानगे 

वाडा : नाटक जत्रेत रंगले लहानगे 

IMG_20180603_181813प्रतिनिधी
      वाडा, दि. ४  : येथे प्रथमच भरलेल्या नाटक जत्रेत विदुषकांच्या धम्माल विनोदी अदाकारीने उपस्थित लहानग्यांमध्ये हास्याचे रंग भरले तर अन्य सादर झालेल्या नाटकांनीही लहान मुलांसह  मोठ्यांनाही खळखळून हसायला लावल्याने येथे भरलेल्या नाटक जत्रेत लहानग्यांसह उपस्थित रसिक चांगलेच  रंगले होते त्यामुळे नाटक जत्रेच्या माध्यमातून लहान मुलांना नाटक ह्या माध्यमाचा वापर करत वेगळा अनुभव मिळाला.  
             रेनबो स्टोरी टेलर्स या संस्थेच्या माध्यमातून येथील आदिवासी सेवा मंडळ संचालित आदिवासी मुलांचे वसतीगृहातील खुल्या रंगमंचावर रविवारी ( दि. ३ ) सायंकाळी ५ ते ८ वाजेदरम्यान  नाटक जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या नाटक जत्रेत लहान मुलांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  नाटक जत्रेला  बाल कलाकार तन्मय मोरे, परिक्षीत विशे यांच्या बालसंगीताने सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात  साकारलेल्या  चित्रकृतींनी मुलांना आकर्षित केले होते. या चित्रांसोबत असंख्य मुले आपली छबी टिपून घेत होते. तर पुस्तकांच्या स्टॉलवर मुलं रेंगाळताना पहायला मिळाली. तर अनेक मुलं पुस्तके खरेदी करत होती. इशान खन्ना, दीप नाईक ह्या कलाकारांनी  विदूषक इंप्रूव्ह कॉमेडी सादर करून धम्माल उडवून दिली. विदुषकांच्या अदाकारीने लहान मुलांसह उपस्थित रसिकांना पोट धरून हसायला लावले. वाड्यासारख्या शहरात प्रथमच विदुषकांच्या अदाकारीचा असा प्रयोग झाल्याने लहान मुले खळखळून हसताना पहायला मिळाली.
            तर अभिनेते चिन्मय केळकर  यांनी  ‘जादूची भांडी’ ह्या तमिळ लोककथेचे एकपात्री सादरीकरण करत जंगल, भूतांसह अन्य पात्रे हुबेहूब उभी करत उपस्थितांना खिळवून ठेवले.  रेनबो स्टोरी टेलर्स टीमच्या  सागर भोईर, राम चौधरी, प्रथमेश भोईर, चेतन पाटील, भावना शेलार  यांनी ‘ बाबाच्या मिशा’ व ‘ दोन कुत्र्यांची गोष्ट’ ह्या छोट्या नाटीका सादर  करून लहान बालकांचे भावविश्व उभे केले. वाड्या सारख्या ग्रामीण भागात भरलेल्या ह्या नाटक जत्रेचा लहान मुलांनी धम्माल आनंद लुटत दाद दिली. त्यामुळे ही नाटक जत्रा ग्रामीण भागातील मुलांना वेगळा आनंद देणारी ठरली असून त्यांना नाटकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बालनाट्य परंपरा सुरू होत असल्याचे उपस्थित रसिकांनी सांगितले. तर ह्या नाटक जत्रेच्या माध्यमातून आगामी काळात  वाडा  परिसरातील मुलांसोबत नाट्य प्रशिक्षण कार्यशाळांद्वारे काम करणार असल्याचे अभिनेते व लेखक चिन्मय केळकर यांनी यावेळी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top