
मनोर, दि. ०३ : सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मनोर परिसरातील टेन,मस्तान नाका,ढेकाळे भागातील सुमारे 15 गाव पाडे शनिवार (ता.२)सायंकाळपासून अंधारात आहेत.मॉन्सून पूर्व तीन तासाच्या पावसाने महावितरण च्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
शनिवारी सायंकाळी 7 वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने मनोर नजीकच्या सावरखंड सबस्टेशन अंतर्गत असलेल्या टेन, मस्तान नाका इंडस्ट्रियल फिडर आणि ढेकाळे फिडर वरील टेन आणि हलोली येथे विजेचे खांब कलंडले आणि सातीवली भागात विद्युत तारांवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या सावरखंड सबस्टेशन अंतर्गत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने विद्युत पुरवठा पुर्ववत करता आला नाही. रविवार आणि वेळेवर कंत्राटदार उपलब्ध नसल्याने खांब उभे करण्यास अडचण येत आहे. तापमानाचा पारा वाढलेला असताना महावितरण च्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे मनोर आणि ढेकाळे परिसरातील सुमारे 15 गाव पाड्याना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान महावितरण कडून खांब उभे करण्याच्या कामास दिरंगाई होत असल्याने टेन नाका आणि टेन गावातील नागरिकांनी वर्गणी काढून खाजगी कंत्राटदारामार्फत विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू केले आहे.