दिनांक 04 July 2020 वेळ 12:22 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » आलेवाडी व नांदगावच्या पाणीपुरवठ्यात रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव

आलेवाडी व नांदगावच्या पाणीपुरवठ्यात रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव

आलेवाडी व नांदगावच्या पाणीपुरवठ्यात रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव

एमआयडीसीचा भोंगळ कारभार; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!


RAJTANTRA MEDIA ONLINE TEAM

001बोईसर, दि. 8 : येथील आलेवाडी व नांदगाव ग्रामपंचायतीच्या मार्फत केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनजवळ औद्योगिक परिसरातील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने या सांडपाण्याचा पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही गावांच्या नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
आलेवाडी व नांदगाव गावांना तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलस्रोताद्वारे ग्रामपंचायत पाणीपुरवठा करते. कुंभवली नाका येथे पाणीपुरवठ्याकरिता असलेल्या पाईपलाईनच्या जोडणीजवळ एका मोठ्या खड्ड्यात कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने मोठ्याप्रमाणावर सांडपाणी साचले आहे. या रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये झाल्याने रासायनिक सांडपाणी मिश्रित पाण्याचा पुरवठा आलेवाडी व नांदगावातील नागरिकांना होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली असताना औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोठ्याप्रमाणावर रासायनिक सांडपाणी साचले आहे. या सांडपाण्याच्या प्रादुर्भावाने आलेवाडी व नांदगाव या गावांत ऐन उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईच्या काळात रासायनिक सांडपाणी मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभारा बाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील पंडित यांनी शिष्टमंडळासह औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता वाझे यांची भेट घेतली असता त्यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने न पाहता हे सांडपाणी ठेकेदाराने सोडल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने महामंडळाचा भोंगळपणाच दिसून येत असल्याचे उपसरपंच पंडित यांनी सांगितले. दरम्यान यासंदर्भात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचेही पंडित म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत जगदीश ठाकूर, मोहन राणे, सुमित ठाकूर, राकेश पाटील आदी उपस्थित होते.

बातमी जेपीजे फॉर्मेट मध्ये डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर जा!

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top