दिनांक 20 February 2020 वेळ 9:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर

LOGO-4-Onlineनाविद शेख 
                मनोर, दि. १३ :  जानेवारी महिन्यात दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त झालेल्या पालघर लोकसभेची पोटनिवडणूक २८  मे रोजी होत आहे.एकमेकांच्या उमेदवारांची पळवापळवी झाल्याने ही  पोटनिवडणूक लक्षवेधी ठरली आहे.सर्व प्रमुख पक्षानी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चौरंगी होणार हे निश्चित असून भाजप आणि बविआमध्ये चुरस असल्याचे दिसून येते.
मात्र अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख १४  असून यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल आणि प्रचाराला रंगत येईल. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विकासाचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आले असून सर्वच राजकीय पक्ष ह्या प्रश्नांवर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
               नवीन पालघर जिल्हा निर्माण झाला. पालघर ला जिल्हा मुख्यालय आल्याने नागरिकांना जिल्ह्यातील प्रश्न लवकर सुटतील अशी आशा होती.परंतु चार वर्षानंतर प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे अवस्थेत आहेत.
पालघर लोकसभेचा पूर्व भाग हा ग्रामीण,दुर्गम आणि आदिवासी बहुल आहे.आदिवासी उपयोजनेतून बांधण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव असताना बिगरसिंचनासाठी आरक्षित करून, स्थानिकांना पिण्यासाठी तसे शेतकऱ्यांना सिंचनासाठी  उपलब्ध न करता,शहरी भागाकडे पळवून नेण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांनी संघटित होत आंदोलन उभं केलं. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम थांबले आहे.परंतु पाणीपुरवठा योजना रद्द झाल्याची घोषणा झालेली नाही.
                या मतदारसंघातुन सुमारे ११५  किलोमीटर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.त्यासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबादला अजूनही जमीनमालकांना मिळाला नाही.महामार्गाचे चौपदरीकरण झाले, त्यांनंतर सहापदरिकरण आणि आता हा महामार्ग आठपदरी करण्याचे काम सुरू आहे. कामाचा दर्जा सुमार असून,प्रखर वळणे,अर्धवट सोडलेले रस्त्याचे काम,टोलनाक्यावर वाहनांचा होणार खोळंबा आणि सुरक्षिततेची ऐसीतैशी करत काम  सुरू आहे.मागील  वर्षभरात शेकडो अपघात होऊन त्यात कित्येकांचे बळी गेले असून अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.महामार्ग पोलिसांनी पालघर जिल्हयात २३  ठिकाणी ब्लॅक स्पॉट(अपघात प्रवण क्षेत्र) जाहीर केली आहेत. ही बाब भयावह असून निवडणुकीच्या निमित्ताने याबाबत चर्चा झाली व्हायला हवी. तर आरोग्य यंत्रणेची अवस्था दयनीय असून सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांसाठी खाजगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे.दुर्गम भागातील अपघातग्रस्त आणि मोठे आजार असलेल्या  रुग्णांना मुंबई,सिल्वासा आणि गुजरात राज्यातील वलसाड येथील रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा लागतो.अपघातग्रस्त रुग्णांना ताबडतोब प्रथमोपचार मिळावा आणि जीवरक्षक अत्यावश्यक सुविधा मिळाव्या याकरिता महामार्गनजीक अद्ययावत रुग्णालय उभारण्यात यावे.ही अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.
कुपोषणाचा प्रश्न सुटण्याऐवजी अजून गंभीर झाला आहे.जव्हार- मोखाडा सारख्या दुर्गम भागात चांगल्या आरोग्य सेवा निर्माण करण्यास अपयश आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांच्या  इमारतींचे बांधकाम निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत असून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासनास अपयश आले आहे.
पालघर लोकसभा मतदार संघाच्या पूर्व भागातून पनवेल-बडोदा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी होत असलेल्या जमीन अधिग्रहनास स्थानिकांचा तीव्र विरोध होताना दिसत आहे.रिलायन्स गॅस पाईपलाईन गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
              पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई तालुक्यातील नारिंगी,खनिवडे,कोपर,चांदीप तसेच पालघर तालुक्यातील पारगाव सोनावे,साखरे,नावझे,दहिसर,हलोली, बहाडोली, तांदुळवाडी,विश्रामपूर याठिकाणी रेती उत्खनन आणि वाहतुकीचा व्यवसाय एकेकाळी जोमात होता. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे रेती परवाने नाकारले गेले.चोरट्या मार्गाने रेतीचा व्यवसाय सुरू ठेवावा लागल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.आज त्यांच्यावर रेतीमाफिया असल्याचा शिक्का बसला आहे.तसेच कर्जबाजारी झाल्याने रेतीव्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रेतीव्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात सर्व पक्ष नाकाम ठरले आहेत.त्यामुळे नाराज रेतीव्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांची भूमीका महत्वाची ठरणार आहे. दगड खाणीद्वारे गौण खनिज उत्खनन करणारे व्यावसायिक नोटबंदी आणि जी.एस.टी कर आकारणीमुळे बांधकाम व्यवसाय थंडावल्याने मुंबईत मालाला मागणी नसल्याने तेही आर्थिक विवंचनेत आहेत.जव्हार मोखाडा या दुर्गम भागाचा विकास होण्यासाठी डहाणू नाशिक रेल्वे मार्गाची जुनी मागणी आहे.ती पूर्ण न करता बुलेट ट्रेन सारखा महागडा प्रकल्प येथील जनतेवर लादला जात आहे.बुलेट ट्रेन प्रकल्पाला जोरदार विरोध होण्याची चिन्ह आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top