दिनांक 22 August 2019 वेळ 2:18 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या जलस्वराज्य समितीवर गुन्हे 

आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या जलस्वराज्य समितीवर गुन्हे 

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
            वाडा, दि. ०१ :  तालुक्यातील आपटी गावातील आदिवासी कातकरी या आदिम जमातीच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले होते. याबाबत वारंवार अर्ज विनंत्या करूनही जल स्वराज्य समितीने त्याकडे दुर्लक्ष  करत या कातकरी वाडीला पाणी देण्यास ठाम विरोध केल्याने ह्या  कमिटीच्या सात पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली आहे. 
               वाडा तालुक्यातील आपटी या गावात सुमारे ४५  घरे असलेली कातकरी वाडी आहे. दहा ते बारा वर्षापूर्वी या ठिकाणी पाण्याची योजना राबवली गेली, त्यानंतर गावा प्रमाणेच या कातकरी वाडीलाही पाणी मिळायचे, दोन वर्षांपूर्वी हे पाणी बंद झाल्याने ही वाडी टंचाईग्रस्त झाली. यानंतर वारंवार याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अर्ज विनंत्या केल्या. श्रमजीवी संघटनेने यात लक्ष घालत याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी  यांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी संबंधित ग्रामपंचायत आणि जल स्वराज्य समितीला सूचनाही दिल्या. त्यानंतर इथे २  इंचाची पाईप लाईन टाकण्यात आली. मात्र तरीही या वाडीपर्यंत पाणी पोहचत नव्हते. याबाबत कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये या दृष्टीने ग्रामस्थ, जलस्वराज्य समिती आणि कातकरी वाडीतील लोक अशी संयुक्त बैठक स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी घेतली. या बैठकीत या समितीला सूचना देऊन चार दिवसात या वाडीला पाण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले. मात्र तरीही या समितीने ह्या वस्तीला पाणीपुरवठा करण्याचे गांभीर्याने घेतले नाही.  अखेर काल श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आणि वाडा पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद भोईर, स्थानिक पोलीस पाटील आणि जल स्वराज्य समिती पदाधिकारी असे संयुक्तपणे प्रत्यक्ष जागेवर गेले, या ठिकाणी पाईप लाईन आणि तिचे व्हॉल्व्ह चेक करण्यात आले. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली, या कातकरी वाडीला पाणी मिळू नये म्हणून त्या व्हॉल्व्ह मध्ये समितीने  बिघाड केला असल्याचे यावेळी उघड झाले. या वाडीला पाणी मिळू नये अशी  उघड भूमिका जलस्वराज्य समितीने घेतल्याने याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत होता.
                यासंदर्भात  पोलिसांनी गंभीर भूमिका घेत पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद भोईर यांच्या जबाब आणि तांत्रिक अहवालाच्या आधारे करुणा कृष्णा मुकणे यांच्या फिर्यादीनुसार वाडा पोलीस ठाण्यात स्वप्नील पाटील, पंकज मराडे,प्रल्हाद पाटील,रमेश पाटील,कल्पेश पाटील,बंडू पाटील आणि मधुकर शेलार आशा सात जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमिती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९  च्या ३ (१० ), ३ (१३ )  आणि भादविस ३४१  अन्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे.
खोटे गुन्हे दाखल केल्याचा ग्रामस्थांचा आरोप;  
पोलीस ठाण्यासमोर केले ठिय्या आंदोलन
            तालुक्यातील आपटी गावातील सहा जलस्वराज्य कमिटी सदस्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.  मात्र, हे गुन्हे खोटे असून ते कुठलीही शहानिशा न करता दाखल केल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी वाडा पोलीस ठाण्यासमोर तब्बल १७ तास ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला.
             तालुक्यातील आपटी गावात जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र,  गेल्या काही दिवसांपासून गावातील कातकरी वाडीत पाणी मिळत नाही म्हणून पाणीप्रश्न गंभीर झाला होता. या संदर्भात सोमवारी सायंकाळी वाडा पोलीस ठाण्यात जलस्वराज्य समितीला पोलिसांनी चर्चेसाठी बोलावले असता या समितीमधील स्वप्नील पाटील, रमेश पाटील, पंकज मराडे,प्रल्हाद पाटील, हेमचंद्र पाटील व रवींद्र पाटील या सहा ग्रामस्थांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
            ही  घटना आपटी गावात वाऱ्यासारखी पसरली व शेकडो ग्रामस्थांनी  वाडा पोलीस ठाण्यात दाखल होत या खोट्या गुन्हाचा जाब विचारला.   समिती सदस्यांवर दाखल केलेले गुन्हे घाईने नोंदविण्यात आले असून कुठलीही शहानिशा न करता ते नोंदविले आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला व याविरोधात वाडा पोलीस ठाण्या समोर ग्रामस्थांनी तब्बल १७ तास ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदविला. दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
         दरम्यान या आंदोलनावेळी शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, वाड्याच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, उपनगराध्यक्षा उमिॅला पाटील, विक्रमगडचे नगराध्यक्ष रविंद्र खुताडे , नगरसेविका सुचिता पाटील यांनी ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन गुन्ह्याची माहिती जाणून घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top