पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात

0
231

LOGO-4-Onlineबोईसर

           दि. २९: येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने भाजपला पाठिंबा न देता रिंगणात उमेदवार उतरवायचा ठरविल्यास भाजपसमोर पराभवाची छाया अधिक गडद होऊ शकते. असे असले तरी शिवसेनेला उमेदवार उभा करणे आणि निवडून आणणे म्हणजे सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असा प्रकार ठरणार आहे.

             पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे ३ महिन्यांपूर्वी आकस्मित निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून लढविण्यात आली होती. शिवसेनेने हा मतदारसंघ कधीही लढविलेला नाही. मात्र त्यापाठोपाठ झालेली विधानसभा निवडणूक सेना भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती. तेव्हापासून सेना भाजपमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
              या पूर्वी पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत भाजपने सेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या मतदारसंघातील भाजपची नसलेली ताकद हे देखील पाठिंबा देण्याचे कारण होते. आता शिवसेना झाकली मुठ न उघडता भाजपला पाठिंबा देऊन उपकाराची परतफेड करु शकते. मात्र चिंतामण वणगांच्या कुटूंबातील उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्यास सेनेला उमेदवार जाहीर करुन स्वतःची ताकद अजमावण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरणार आहेत.
शिवसेनेचे नवनियुक्त पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा आणि नवीन नेमणूका झालेले पदाधिकारी ही शिवसेनेची जमेची बाजू असून त्यांना या निमीत्ताने स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. यातून आगामी विधानसभा निवडणुकांची बांधणी करण्यासाठी पोटनिवडणुकीचा उपयोग होणार आहे. जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी ” निवडणूकीसाठी आम्ही सज्ज आहोत, आदेशाची वाट पहात आहोत ” अशी प्रतिक्रिया देऊन सस्पेंस कायम राखला आहे.

 

Print Friendly, PDF & Email

comments