दिनांक 22 March 2019 वेळ 1:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

वनवासी समाजाने संघर्ष करुन हिंदू संस्कृती टिकवली-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

राजतंत्र मिडीया :
MOHAN BHAGWAT
डहाणू दि. १६: आदिवासी समाजाने कायम सनातन हिंदुत्व आणि वैदिक परंपरा जपण्याचे कार्य केले आहे. वनवासी हा आपला बंधू आहे. तो शेवटपर्यंत लढला, परंतु दृष्ट शक्तींना शरण गेला नाही. मात्र आपण त्याला उपेक्षित ठेवले. असे करून चालणार नाही. आपल्या मुलाबाळांना, उर्वरित समाजाला त्याचा परिचय करून दिला पाहिजे. पुढील पिढ्यांपर्यंत हे संचित पोहोचविले पाहिजे. परस्परांतील एकता जपली पाहिजे. त्यांना प्रगतीची संधी दिली पाहिजे. स्वतःच्या उत्पन्नाचा एक तृतीयांश हिस्सा आणि आयुष्यातील एक तृतीयांश वेळ या समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला, तर लवकरच हा समाज मुख्य प्रवाहात येईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी डहाणू येथे बोलताना व्यक्त केला. 
समाजातील एकजूट कायम राहिली तर अनेकांची स्वार्थाची दुकाने लवकरच बंद होतील. गोड बोलून, आपला कळवळा दाखवणारी आणि धर्मांतर करणारी ही मंडळी मायावी आहेत. दोन बोक्यांच्या भांडणात लोणी खाऊन जाणारी ही माकडाची प्रजात आहे. अशांपासून आपण सजग राहणे आवश्यक आहे, असा इशारा देतानाच तलासरी प्रकल्पाने असे अनेक सजग कार्यकर्ते तयार केल्याचे प्रशंसोद्गार भागवत यांनी काढले.
विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून तलासरी येथे सुरु झालेल्या जनजाती वसतीगृह प्रकल्पाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने डहाणू तालुक्यातील आसवे येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी सवितानंदजी महाराज, बालयोगी सदानंद महाराज, महामंडलेश्वर बाप्पा, अशोकजी चौगुले, देवकीनंदन जिंदाल आदी मान्यवर उपस्थित होते.
भागवत पुढे म्हणाले की, भाषा, प्रांत, जातीची ओळख सांगताना आपले हिंदू असणे ही मुख्य ओळख आपण विसरत चाललो आहोत. हिंदू ही ओळख जपण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. राममंदिर उध्वस्त करणारा भारतातील मुस्लीम समाज नव्हता. भारतीय नागरिक असे करूच शकत नाही. परकीय शक्तींनी भारतीयांचे खच्चीकरण करण्यासाठी येथील मंदिरे उध्वस्त केली. पण आज आपण स्वतंत्र आहोत. जे जे उध्वस्त आहे, ते ते पुन्हा उभे करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण ही केवळ मंदिरे नव्हे, तर आमच्या अस्तित्वाची ओळख आहेत. राम मंदिर उभे राहिले नाही तर आमच्या संस्कृतीचे मूळ कापले जाईल. मंदिर जेथे होते, तिथेच ते बनणार यात शंकाच नाही असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला.
विराट हिंदू संमेलनासाठी विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी भव्य सभामंडप उभारला होता. परिसरात ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. वाहनतळांवर आणि सभास्थानांवर मुबलक स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातून घरटी ४ चपात्या, याप्रमाणे चपात्या जमा करुन आलेल्या पाहुण्यांची अतिशय नियोजन पद्धतीने जेवणाची सोय करण्यात आली होती. ऐन उन्हाळ्यातील दुपारी २ ते ५ या भर उन्हाच्या वेळेतही सभेसाठी जवळपास २५ ते ३० हजार लोकांनी हजेरी लावली.

comments

About Rajtantra

Scroll To Top