महिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली

0
638
JANSHAHI1
राजतंत्र मिडीया
दि. १६: डहाणू शहरातून गुजराथी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या जनशाही या साप्ताहिकाचे संपादक पंकज सोमैय्या यांचेवर महिलांची मानहानी करणारी, बिनबुडाची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे महिला आयोगाने डोळे वटारल्यानंतर बिनशर्त माफीनामा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे गुजराथी साहित्य क्षेत्रात मानाचे अढळ स्थान पटकावलेल्या स्वर्गीय जेठालाल सोमैय्या यांचा गौरवशाली वारसा असलेल्या साप्ताहिक जनशाहीची प्रतिमा डागाळली आहे.
सोमैय्या यांनी ४ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या जनशाहीच्या अंकात डहाणूतील उमंग सतिश ठक्कर या युवकाच्या खासगी आयुष्यामध्ये डोकावत, उमंगसह त्याचे वडील सतिश, विवाहित बहीण व बहिणीची विवाहित नणंद यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणारी बदनामीकारक बातमी छापली होती. यातून ३ कुटूंबांचा मानसिक छळ व बदनामी झाली होती. या बातमीमुळे व्यथित झालेल्या उमंगच्या बहिणीच्या नणंदेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तक्रार प्राप्त होताच महिला आयोगाने पोलीसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पंकज सोमैय्या यांना देखील १२ एप्रिल रोजी हजर रहाण्याचे समन्स बजावले होते.
दुसरीकडे उमंगच्या बहिणीने प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली, तर उमंगने वकिलामार्फत नोटीस बजावली होती. उमंगच्या अडचणीत वाढ अशा मथळ्याच्या असत्य बातम्या छापता छापता पंकज सोमैयांना स्वतःच्या अडचणीत झालेली वाढ कळून आली नाही. आणि मग महिला आयोगाने डोळे वटारल्यानंतर सोमैय्या भानावर आले. हादरलेल्या सोमैय्यांनी तक्रारदारांकडे क्षमा याचना केली आणि बिनशर्त माफी मागण्याची तयारी दर्शवली. उमंग ठक्कर यांनी सोमैय्यांचे वय लक्षात घेता सोमय्यांचा माफीनामा स्विकारला. ठरल्याप्रमाणे १५ एप्रिल रोजीच्या अंकात सोमैय्यांनी जनशाहीच्या पहिल्या पानावर बिनशर्त माफिनामा प्रसिद्ध करुन ४३ वर्षांच्या इतिहासावर भला मोठा काळा डाग लावून घेतला. असे असले तरी अजूनही पंकज सोमैय्यांवर अब्रूनुकसानीच्या खटल्याची टांगती तलवार बाकी आहे.
प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे महिलांच्या व बालकांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अनुचित ठरते. लोकांच्या खासगी आयुष्याबाबत, तसेच गॉसिप करणाऱ्या, कानात सांगणाऱ्या कॉलमद्वारे देखील कुणाचे चारीत्र्यहनन करता येत नाही. बातम्या Interest of the public पाहून न छापता public interest तपासून छापणे अपेक्षीत असते. बदनामीकारक मजकूर छापल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास आरोपीला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
-ॲडव्होकेट शेखर जोशी
(उमंग ठक्करचे वकिल)
Print Friendly, PDF & Email

comments